esakal | Corona Update : पुण्यात सक्रीय रुग्णांची संख्या घटतेय

बोलून बातमी शोधा

corona
दिलासादायक! पुण्यात सक्रीय रुग्णांची संख्या घटतेय
sakal_logo
By
- गजेंद्र बडे

पुणे : पुणे शहरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत आजअखेरपर्यंत (ता.५ ) सक्रीय रुग्णांची संख्या तब्बल १२ हजार ८१ ने कमी झाली आहे. यानुसार शहरात दररोज सरासरी ८०५ कोरोना रुग्ण कमी होत आहेत. सध्या शहरात ३९ हजार ८३९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

शहरातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ८ हजार ७०४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत आली आहे. शिवाय ३१ हजार १३५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५१ हजार ९२० इतकी होती, असे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या दैनंदिन आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षण रद्द! पुण्यात आंदोलकांना घेतलं ताब्यात

दरम्यान, पुणे जिल्ह्यात काल (मंगळवारी) ७ हजार ९५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारच्या (ता.४) एकूण रुग्णांत शहरातील २ हजार ८७९ रुग्ण आहेत. तसेच ९ हजार १३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ३ हजार ६७८ रुग्ण आहेत. अन्य १३१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील ६३ मृत्यू आहेत.

मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांत पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ८०५ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ६९१, नगरपालिका हद्दीत ४९८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये पिंपरी चिंचवडमधील ४०, ग्रामीण भागातील २२ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: ''राज्य सरकारचे अपयश; मराठा समाजाची केली फसवणूक''

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा