
वारजे : पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे 'संजीवन वन उद्यान' ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल. असे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी वारजे येथे केले. पुणे महानगर परिसरात वनविभागाच्या टेकड्या व जागा आहेत, त्याठिकाणीही वृक्षारोपण करताना देशी वृक्षारोपणाला प्राधान्य दयावे.
अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. वारजे येथील डुक्कर खिंडीजवळ वनविभागाच्या 35 एकर जागेत पुणे महानगरपालिका व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 'संजीवन वन उद्यान' उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, प्रशांत जगताप, बाबा धुमाळ, बाबुराव चांदेरे, आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे महानगरपालिका व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित 'संजीवन वन उद्यान' एका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरेल. जैवविविधता जोपासणारे हे उद्यान ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल.
सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच वारजे, कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी एक चांगला ऑक्सीजन पार्क तयार होईल. महानगरालगतच्या टेकड्या व मोकळ्या वनजमिनींवर वनविभागाने वृक्षारोपनाचे नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, तसेच वृक्षारोपन करताना देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य दयावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
'संजीवन वन उद्यान' प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'संजीवन वन उद्यानामध्ये विविध प्रकारचे वृक्ष पाहण्यास मिळणार आहे. या उद्यानात येणा-या नागरिकांना चांगली हवा मिळणार आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे.
त्यासाठी आपण अनेक ऑक्सिजन प्लांट्स तयार केले. मात्र हा नैसर्गिक प्लांट असून हे टिकवणे गरजेचे आहे. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे वृक्षारोपनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित 'संजीवन वन उद्यान' वारजे व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.