महिला दक्षता समितीतर्फे कौटुंबिक छळाच्या ९३० पैकी ९०५ केसेस निकाली

पुणे जिल्ह्यातील दक्षता समित्यांच्या महिलांनीच महिलांना गावातच न्याय मिळवून देण्यात आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
domestic violence
domestic violencesakal media

पुणे : पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या कौटुंबिक छळाच्या ९३० केसेस घडल्या. यापैकी ९०५ केसेस या गाव पातळीवरच मिटविण्यात महिला दक्षता समित्यांना यश आले आहे. गावात तक्रारी मिटण्याचे हे प्रमाण तब्बल ९७ टक्के इतके आहे. पुणे जिल्ह्यातील दक्षता समित्यांच्या महिलांनीच महिलांना गावातच न्याय मिळवून देण्यात आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने गावपातळीवर नेमण्यात आलेल्या महिला दक्षता समित्यांमुळे हे शक्य झाले आहे. दक्षता समित्यांनी घरोघरी जाऊन पीडित महिलांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा करणे, त्यांचे प्राथमिक समुपदेशन करणे आणि गरज भासल्यास संरक्षण अधिकाऱ्यांची मदत घेणे किंवा नवऱ्याचे संस्थात्मक विलगीकरण करत, या तक्रारींचा निपटारा करण्यात दक्षता समित्यांच्या महिलांना यश आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील गावा-गावात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या होत्या. महिलांवर कामाचा अतिरिक्त ताण येणे, घरातील आर्थिक ताण-तणाव आणि जीवनावश्यक वस्तु मिळण्यासाठी भासणारी चणचण आदी गोष्टींमुळे या समस्यांचे प्रमाण वाढल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आले होते. यावर मार्ग काढण्यासाठी महिला सुरक्षा व दक्षता समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांमध्ये महिला व बालकल्याण अधिकारी, महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, महिला ग्रामसंघ, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव आणि महिला पोलिस पाटील आदींचा समावेश केला आहे.

या दक्षता समित्यांमुळे गाव पातळीवर तळागाळात सकारात्मक परिणाम होणे, महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आत्मविश्‍वास निर्माण होणे, महिलांचे प्रश्‍न कोणत्याही कलंकाशिवाय गावातच सोडविण्यात यश येणे, घडल्याचा निष्कर्ष एका अभ्यासाद्वारे काढण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

दक्षता समित्यांचे झालेले फायदे

  • कौटुंबिक हिंसाचारातील पीडित महिलांना तत्काळ मदत

  • मुली व महिलांच्या गरजा समजून घेण्यासाठी उपयुक्त

  • महिलांना गाऱ्हाणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध

  • बचत गटांद्वारे महिलांचे सक्षमीकरण होण्यास फायदा

  • सर्वांगिण विकासात स्थानिक महिलांचा सहभाग वाढला

  • पुणे जिल्ह्यातील एकूण दक्षता समित्या - १ हजार ४५५

  • कौटुंबिक हिंसाचाराबाबत केलेले सर्वेक्षण - ६ हजार ३२ कुटुंबे

  • कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण केसेस - ९३२

  • गाव पातळीवर मिटलेल्या केसेस - ९०५

  • पुढील कारवाईसाठी हस्तांतरित केसेस - २७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com