रखवालदाराकडूनच एक कोटीची घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पिंपरी - कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. रखवालदारानेच हे कृत्य केल्याचा संशय आहे.

पिंपरी - कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. रखवालदारानेच हे कृत्य केल्याचा संशय आहे.

विनोद राजकुमार अगरवाल (वय ४८, रा. पंचवटी बंगला, वृंदावन हॉटेलच्या बाजूला, भक्‍ती-शक्‍ती चौकाजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोविंद कालू परियार (रा. कलाली, लमकी, देश नेपाळ) व त्याचे साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी बंगल्यामध्ये पाच अगरवाल बंधू राहतात. त्यांच्या नातेवाइकांचा टिळ्याचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पुण्यात असल्याने सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गेले. रात्री दीडच्या सुमारास ते परत घरी आल्यावर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी बंगल्यातील दोन घरांचे दरवाजे आपल्या साथीदारांच्या मदतीने कटावणीच्या साहाय्याने उचकटून आतील रोख रक्‍कम, सोने-चांदी आणि हिऱ्याचे दागिने असा ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अगरवाल कुटुंबीय कार्यक्रमासाठी गेल्यावर सुरक्षारक्षक परियार याने आपल्या साथीदारांना सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास बोलावून घेतले. चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून कनेक्‍शन बंद केले. त्यानंतर कटावणीच्या साहाय्याने दोन दरवाजांचे लॅचलॉक तोडले आणि घरात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडत नसल्याने एका चोरट्याने तो तोडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या हाताला काच लागली. त्यामुळे घटनास्थळी रक्‍ताचे दाग आढळले.

ओळखीनेच केला घात
अगरवाल कुटुंबीयांकडे पूर्वी एक सुरक्षारक्षक दहा वर्षांपासून कामाला होता. तो गावाला जाताना त्याने आपल्या जवळच्या नातेवाइकास नोकरीसाठी ठेवले. त्या नातेवाइकाने आपल्या ओळखीच्या व्यक्‍तीला म्हणजे परियार याला नोकरीला ठेवले. त्याच्याबाबत कोणतीही माहिती अगरवाल कुटुंबीयांनी घेतलेली नव्हती.

Web Title: theft crime