चोरानेच आणून ठेवला चोरलेला ऐवज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नसरापूर (पुणे) : घरातील चोरीला गेलेले सोने, दुसऱ्या दिवशी घराच्या दारात चोरानेच आणून ठेवल्याची घटना मोहरी (ता. भोर) येथे घडली. राजगड पोलिसांची नामी शक्कल यास कारणीभूत ठरली.

 

नसरापूर (पुणे) : घरातील चोरीला गेलेले सोने, दुसऱ्या दिवशी घराच्या दारात चोरानेच आणून ठेवल्याची घटना मोहरी (ता. भोर) येथे घडली. राजगड पोलिसांची नामी शक्कल यास कारणीभूत ठरली.

मोहरी येथील नामदेव बाबूराव लेकावळे यांच्या घरामध्ये शनिवारी चोरी झाली. चोरट्याने सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. लेकावळे यांनी राजगड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी चोरीच्या घटनेची पाहणी करण्यासाठी पोलिस हवालदार नितीन रावते, सुधीर होळकर व सचिन काळे यांना पाठविले. तीनही कर्मचाऱ्यांनी चोरी झालेल्या घराची पाहणी केली असता चोरी जवळच्याच कोणीतरी केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेमुळे मोहरी येथील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी गावात बैठक बोलविली. या बैठकीस उपस्थित पोलिस कर्मचारी रावते व होळकर यांनी शक्कल लढवून या चोरीमधील चोर हा परिसरातीलच असून त्याचे हाताचे ठसे व काही पुरावे आम्हास मिळाले आहेत. लवकरच त्या चोरास आम्ही ताब्यात घेणार आहोत, असे जाहीर केले.

पोलिसांनी जाहीर केलेली घोषणा चांगलीच कामी आली. आपले काही खरे नाही याची जाणीव झालेल्या चोराने संपूर्ण गाव झोपेत असताना लेकावळेच्या घरासमोर पायरीवर चोरलेले दागिने आणून ठेवले. सोमवारी सकाळी लेकावळे यांनी घराचा दरवाजा उघडला तर त्यांना दरवाजात कागदात गुंडाळलेले दागिने दिसले. त्यांनी तातडीने ही घटना पोलिसांना कळवली. मोहरी ग्रामस्थांनी या घटनेबाबत पोलिस कर्मचारी नितीन रावते, सुधीर होळेकर व सचिन काळे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या क्‍लृप्तीमुळे लेकावळे यांची आयुष्यभराची कमाई परत मिळाली. दागिने परत मिळाल्याने लेकावळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Return Stolen Goods