तुकाईवाडीच्या तुकाईदेवीच्या मंदिरात चोरी ; 83 हजारांचा ऐवज लंपास

राजेंद्र सांडभोर
शनिवार, 21 जुलै 2018

तुकाईदेवीचे डोळे चोरीला गेल्याचे समजताच देवीचे भक्त असलेल्या राजगुरूनगर येथील दोंदेकर ज्वेलर्सचे प्रवीण दोंदेंकर यांनी लागलीच देवीसाठी सोन्याचे डोळे बनवून देवीला अर्पण केले. ग्रामस्थांनी व पुजाऱ्यांनी धार्मिक विधी करून देवीला डोळे बसविले. 

राजगुरुनगर : राजगुरुनगरजवळील तुकाईवाडी येथील तुकाईदेवी मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी देवीचे सोन्याचे डोळे व नथ चोरीस आणि चांदीच्या पादुका गुरुवारी रात्री चोरून नेल्या. मंदिरात आणि आवारात सीसीटीव्ही लावलेले असतानाही चोरटयांनी चोरी केली आणि सीसीटीव्ही व हार्डडिस्क चोरून नेल्याने चोरटे खूपच सराईत असावेत असा पोलिसांचा कयास आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी चंद्रकांत विष्णू कोरडे यांनी  याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पहाटे मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. तुकाईदेवीचे दागिने चोरले. त्याबरोबर मधल्या गाभाऱ्यातील दरवाजाचा चांदीचा पत्रा आणि आणि मंदिरातील दानपेट्यातील रोख रक्कमही चोरून नेली. एकूण ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. मंदिरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर फोडून त्यातील हार्डडिस्क त्यांनी काढून नेली. तसेच कॅमेरेही तोडले. खेड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, टी. एस. हगवणे अधिक तपास करीत आहेत.  

दरम्यान, शुक्रवारी पहाटे खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी श्वानपथक पाचारण करून तपास करण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांचा तपास लागू शकला नाही. 

तुकाईदेवीचे डोळे चोरीला गेल्याचे समजताच देवीचे भक्त असलेल्या राजगुरूनगर येथील दोंदेकर ज्वेलर्सचे प्रवीण दोंदेंकर यांनी लागलीच देवीसाठी सोन्याचे डोळे बनवून देवीला अर्पण केले. ग्रामस्थांनी व पुजाऱ्यांनी धार्मिक विधी करून देवीला डोळे बसविले. 

Web Title: Theft in Tukaidevi temple in Tukaiwadi 83 thousand rupees theft