पुण्यातील अनेक लॉजेस्‌, मंगल कार्यालय, ब्युटी पार्लरची नोंदच नाही

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

‘‘ शहरात लॉजेस्‌, मंगल कार्यालय, सलून, ब्युटी पार्लर, पान टपरी, रसवंतीगृह आदीची नोंदणीकृत संख्या १९०० आहे. पुणे शहराचा विचार करता ही संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे विशेष अभियान घेऊन सर्व लॉजेस्‌, मंगल कार्यालयांसह सर्व दुकानांची नोंदणी करण्यात येणार आहे.’’

- डॉ. मनिषा नाईक, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका

येरवडा : शहरातील अनेक लॉजेस्‌, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतीगृह, पान टपरी असो की अंडीविक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. आरोग्य विभागात केवळ त्यांची एकूण संख्या फक्त 1900 आहे. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लक्षवधी रूपयांचे नुकसान होत आहे. याचे गांभीर्य ना लोकप्रतिनिधींना आहे ना प्रशासनाला.

आरोग्य विभागात शहरातील सर्व लॉजेस्‌, मंगल कार्यालय, सलून, पान टपरी, अंडी विक्रेता यांची नोंद करणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिका प्रति लॉजला प्रति वर्ष चार हजार आठशे रूपये, मंगल कार्यालयाला प्रति वर्ष पाच हजार रूपये शुल्क आकारले जाते. ब्युटी पार्लरला प्रति खुर्ची चारशे रूपये, सलूनला प्रति खुर्ची पन्नास रूपये तर पान टपरी व अंडी विक्रेते यांना ऐंशी रूपये शुल्क आकारले जाते. मात्र, अनेकांची महापालिकेत नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दरवर्षी महापालिकेचे लक्षवधी रूपये नुकसान होत आहे. याचे गांभीर्य ना लोकप्रतिनिधींना आहे ना प्रशासनाला अशी टीका नागरिकांनी केली आहे.

नोंदणीकृत :

लॉजेस्‌ -५३४, सलून -४६५, मंगल कार्यालय-१५० , ब्युटी पार्लर-२५५ , 
पान टपऱ्या - २२२ , अंडी विक्रेते- २३८ 

आरोग्य विभागाचे शुल्क चौदा वर्षांपूर्वीचे

शहरातील लॉजेस्‌, मंगल कार्यालय, सलून, ब्युटी पार्लर, पान टपरी यांना अाकारण्यात येणारे शुल्क हे २००४ पासूनचे आहेत. यामध्ये गेल्या चौदा वर्षांत एकदाही वाढ झाली नाही. भविष्यात दर वर्षी दहा टक्के दराने ही वाढ करण्याचा ठराव करण्यात येणार असल्याचा विचार आरोग्य विभागाचा आहे.

Web Title: There are no reports of many lodges beauty parlor in Pune