esakal | पुण्यात ‘ब्रेक द चेन’च्या नियमांबाबत स्पष्टता नाही, नियोजन काय करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Break The Chain

पुण्यात ‘ब्रेक द चेन’च्या नियमांबाबत स्पष्टता नाही, नियोजन काय करणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘नियमांबाबत कोणतीच स्पष्टता नाही. मंडई सुरू आहे; परंतु संचारबंदीही आहे, मग जायचे कसे?, किराणा दुकानातून गहू आणले, परंतु दळून आणायचे कोठून? कारण गिरणीच बंद आहे... असे एक ना अनेक प्रश्न आहेत. ‘ब्रेक द चेन’साठी नियम अत्यावश्यकच आहे, त्यामध्ये अधिक स्पष्टता हवी...’’, असे अनुष्का घारे सांगत होत्या. राज्य सरकारने बुधवारी सायंकाळपासून कडक निर्बंध जाहीर केले आहेत. गेल्यावर्षी याच दरम्यान कडक लॉकडाउन लागल्याने सुरवातीला कुटुंबातील आवश्यक गोष्टी मिळविण्यासाठी महिलांचे जास्त हाल झाले. या पार्श्वभूमीवर आणखी काय निर्बंध लागणार, याबद्दल गृहिणींच्या मनात साशंकता होती.

हेही वाचा: पुणेकरांच्या २२ प्रश्नांची उत्तरं; काय सुरू काय बंद?

‘‘चार दिवसांची भाजी आणून ठेवली, महिनाभराचा किराणाही भरला आहे,’’ असे सांगत घारे म्हणाल्या किराणाचे एकवेळ ठीक आहे, भाजी किती दिवस पुरणार?, त्यासाठी घरात कडधान्यही आणले आहेत. शक्यतो बाहेर पडायला लागू नये, यासाठी पुरेशी तजवीज केली आहे. परंतु निर्बंधांबाबत काहीच स्पष्टता नाही.

‘‘काय सुरू आणि काय बंद आहे, याचा काही ताळमेळच नाही,’’ अशी उद्विग्नता अंजली दारव्हेकर यांनी व्यक्त केली. ‘‘एकीकडे संचारबंदी आहे, हे सांगायचे आणि दुसरीकडे काय सुरू याचा पाढा वाचायचा. नक्की काय करणार, काहीच समजत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची पंचाईत झाली आहे. नियमांच्या अंमलबजावणीत कमालीची संदिग्धता आहे. ती आधी दूर झाली पाहिजे.’’

हेही वाचा: पुण्यात आता हॉस्पिटलमध्येही 'रेमडेसिव्हर'चा खडखडाट

जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार, असे सांगितल्याने फार ताण नाही, असे मत स्नेहल शिंदे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘निर्बंधांमुळे काही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. काही प्रमाणात कामे ठप्प होणार आहेत. किराणा सोडला तर कशाकशाची साठवणूक करणार हा प्रश्नच आहे. जीवनावश्यक वस्तू योग्य पद्धतीने आणि प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात एवढीच अपेक्षा आहे.’’

गृहिणी काय म्हणतात?

- निर्बंध आवश्यक आहेत. मात्र त्याची स्पष्टता हवी.

- निर्बंधातून नक्की कोणाला सवलत आहे?

- संचारबंदी लागू असेल तर जीवनावश्यक वस्तू आणायला बाहेर कसे पडणार?

- कोणती दुकाने बंद आणि कोणती सुरू राहणार, हे स्पष्टपणे सांगावे.

- खासगी कार्यालये सुरू असतील तर सार्वजनिक वाहनांतून प्रवासास मुभा आहे का?

- लसीकरण सुरू आहे का? दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठांना बाहेर पडता येईल का?

हेही वाचा: ‘पंच’नामा : माझं कुटुंब, ‘किंबुहना’ माझी जबाबदारी