मावळातील या तीन धरणांमधून वाढविला विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

- मावळ तालुक्यात पावसाचे पुनरागमन 
- तीन धरणांमधून वाढविला विसर्ग
- गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी 

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्त्वाच्या तीनही धरणांतून पाण्याचा विसर्ग काहीसा वाढविण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भात पिकासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरत आहे. 

मावळ तालुक्‍यात पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चोवीस तासांत रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी वडगाव येथे 18 मिलिमीटर, तळेगाव दाभाडे (15), कामशेत (35), कार्ला (127), पवनानगर (28), वडिवळे (40), लोणावळा (130), तर शिवणे येथे 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

रविवारी सकाळपासूनही पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने सर्व धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणातून प्रतिसेकंद पाच हजार 700 क्‍युसेक, वडिवळे धरणातून दोन हजार 500 क्‍युसेक, तर आंद्रा धरणातून प्रतिसेकंद एक हजार 800 क्‍युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात येत होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. 

गणेश विसर्जनावर परिणाम 
भातासह अन्य खरीप पिकांसाठी पावसाची आवश्‍यकता होती. गरजेच्या वेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, रविवारी वडगाव, तळेगावसह अनेक गावांमध्ये सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर व कार्यकर्त्यांच्या उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These three dams in maval whose water flow increase