Pune Rains : ...अन् क्षणार्धात त्यांचे संसार प्रवाहात वाहून गेले

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

भीमरत्न गायकवाड आणि त्याच्या नातेवाईकांनी १४ ऑक्टोबरला बहिणीच्या होणाऱ्या लग्नासाठी तीस हजार रुपयांची रोख रक्कम घरात ठेवली होती. तर, आईने बहिणीसाठी काही सोन्याचे दागिने केले होते, असे सगळं घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. अन तेच भीमरत्नच्या घरात पाणी घुसल्याने कपाट बुधवारी पाण्यात वाहून गेले.

Pune Rains : खडकवासला : ''मी झोपलो होतो. लोकांच्या आवाजाने जाग आली. 'पाणी आलं- पाणी आलं' असं लोक ओरडत होते. घरामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली होती. त्यामुळे घरातील काही वस्तू घेऊन आम्हाला बाहेर पडता आले नाही. अंगावरील कपड्यानिशी आम्ही चौघेजण घराच्या बाहेर पडलो आणि ती आमच्यासाठी काळरात्र होती.'',हे सांगताना अशोक तेलंग यांना डोळ्यात आलेले पाणी ते लपवू शकत नव्हते. ''आमचं मुळगाव पानशेत धरणातील. मुलांच्या शिक्षण आणि त्यांच्या भविष्यासाठी १६ वर्षांपूर्वी आम्ही किरकटवाडीत आलो. गावाकडची काही थोडी जमीन विकून इथे जागा घेतली. फेब्रिकेशनचा व्यवसाय करत मी आणि पत्नीने दोन मुलांना वाढविले. 
पैसे जमा करून हा संसार उभा केला होता. परंतु हा संसार बुधवारच्या अतिवृष्टीत काही क्षणात वाहून गेला. मावळे आळीत अशोक कुटुंबासमवेत राहत होते. पानशेत धरणातील दापसरे गावचे. पाण्याचा प्रवाह त्यांच्या घरात मागील बाजूने शिरला पुढील बाजूने तो सर्व संसार वाहून घेऊन गेला. 

बहिणीच्या लग्नाची पुंजी वाहून गेली
भीमरत्न गायकवाड आणि त्याच्या नातेवाईकांनी १४ ऑक्टोबरला बहिणीच्या होणाऱ्या लग्नासाठी तीस हजार रुपयांची रोख रक्कम घरात ठेवली होती. तर, आईने बहिणीसाठी काही सोन्याचे दागिने केले होते, असे सगळं घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. अन तेच भीमरत्नच्या घरात पाणी घुसल्याने कपाट बुधवारी पाण्यात वाहून गेले. ते सर्वजण गुरुवारी दिवसभर कपाट शोधत होते. अखेर पर्यंत कपाट सापडलेच नाही.आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी,दोन मुले, भावाची बायको व त्याची मुलगी असा नऊ दहा जणांचा परिवार होता. मी रिक्षा चालवतो. आई धुणं-भांडी करते. भाऊ एका ठिकाणी खाजगी नोकरी करतो. काल रात्री तो पाण्याचा प्रवाह आला आणि काही सेकंदात आमच्या घरातलं सर्व काही घेऊन गेला. आम्ही मूळचे सोलापूरचे. पस्तीस वर्षापासून आम्ही येथे राहतो. आईने धुणं-भांडी करून ही जागा विकत घेतली. मग, त्याच्या जमेल तसं पैसे वाचवून घर बांधले. पण, या पावसाला सगळं वाहून गेलं",हे सांगताना तो पूर्ण खचून गेला आहे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.   

आमच्या घराची बसलेली घडी पाण्याच्या प्रवाहावे उलगडली
रात्री मी जेवत होतो. लोकांचा आवाज आला, म्हणून मी जेवणाचे ताट घेऊन बाहेर आलो. पाहतो तो काय पाण्याचा लोंढा आमच्या घराकडे येत होता. पाणी घरात घुसून तो साठत होता. आई-वडील आणि बहीण असे आम्ही चौघेजण राहतो. केवळ अंगावरील कपड्याचं आम्ही घराबाहेर पडलो. जाताना शेजारच्यांना सगळ्यांना घेऊन बाहेर पडत होतो. आम्ही सोळा सतरा वर्षापासून राहतो. आता आमच्या घराची घडी बसायला सुरवात झाली अन् या पाण्याच्या या प्रवाहाने घडी उलगडली'' असे सांगताना सखाराम खेळकर यांचे डोळे पाण्याने डबडबले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They Lost everything in Kirkatwadi Flood due to heavy Rains in pune