वाट चुकलेल्यांना ते दाखवतात घरचा मार्ग

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 1 जानेवारी 2019

वडिलांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, उपचार सुरू आहेत. एकदा सकाळी ते फिरायला घराबाहेर पडले; पण घरी आले नाहीत. पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दिली होती. पाच दिवसांनी पोलिसांनी वडील सापडले असल्याचा फोन केला. त्यानंतर आम्ही वडिलांना घरी घेऊन आलो. 

- संजय केकाण 

पुणे : भैरोबानाला परिसरामध्ये 3 डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता 86 वर्षांची महिला फिरत होती. संबंधित वयोवृद्ध महिला हरवले असल्याचे सांगत असून तिला मदतीची गरज असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी गेले. महिलेची विचारपूस केली त्या वेळी गावाचे व स्वतःचे नाव वगळता महिलेला काहीच सांगता येत नव्हते. पोलिसांनी संबंधित गाव, तेथील पोलिस ठाणे शोधून महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून महिलेला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप पोचविले..! या आणि अशा हरवलेल्या, वाट चुकलेल्या 2305 जणांना पोलिसांतील माणुसकीने त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परत आणला आहे. 

वेगवेगळ्या कारणांमुळे काही व्यक्ती आपल्या घरापासून दूर निघून जातात. मात्र इच्छा असूनही पुन्हा घरी परतण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. अशावेळी विमनस्क अवस्थेत बसस्टॉप, रेल्वे स्थानक, फुटपाथ, एखादे हॉटेल, सोसायटीचे प्रवेशाद्वार किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आपले जीवन कसेबसे जगण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहात नाही. अशा वाट चुकलेल्या असंख्य व्यक्ती अवती-भोवती दिसतात. मात्र काही संवेदनशील व्यक्तींच्या नजरेस अशा व्यक्ती पडल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. वर्षभरात पुणे पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास प्राधान्य दिले होते. 

बेपत्ता होण्याची अथवा हरवण्याची कारणे 

* स्मृतिभ्रंशामुळे किंवा मानसिक आरोग्य ठीक नसल्यामुळे 
* पालकांसमवेत असताना गर्दीच्या ठिकाणी चुकामूक 
* कौटुंबिक भांडणातून घर सोडणे 
* प्रेमसंबंधांतून घरातून निघून जाणे 
* एखाद्याकडून जाणीवपूर्वक फसवणूक होणे 
* पालकांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे न पेलवणे 

हरवलेल्या व्यक्तींबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ पोलिसांच्या बिनतारी संदेश यंत्रणेवर संबंधित व्यक्तीची माहिती प्रसारित केली जाते. गस्तीवर असणाऱ्या बीटमार्शलला किंवा पोलिस ठाण्यांकडे आलेल्या माहितीवरून हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे पोचविले जाते. मात्र 18 वर्षांखालील मुले-मुली हरवल्यास 363 कलमान्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा तपास केला जातो. 

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा. 

"ऑपरेशन मुस्कान'अंतर्गत 40 जण कुटुंबांकडे सुपूर्त 
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या वर्षी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत घरातून पळून आलेल्या 40 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेतला. त्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमधील मुला-मुलींचा समावेश होता; तर दोन अल्पवयीन मुली प्रेमसंबंधांतून घरून पळून आल्या होत्या. या सर्व मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी दिली. 

दुभाषकाची मिळते मदत ! 

बेपत्ता झालेली, हरवलेली किंवा घरातून पळून जाणारी बहुतांश वृद्ध नागरिक, महिला व मुले-मुली, रुग्ण हे मराठी असतात; तर काहीजण हिंदी भाषक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे शक्‍य होते. मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी अशी कुठलीच भाषा येत नसणारेही काहीजण पोलिसांना सापडतात. त्यांच्याशी दुभाषकाद्वारे संवाद साधण्यावरही प्रयत्न केला जातो. 

Web Title: They Show The missed ones the way home