चोरट्यांकडून महिला प्रवासी लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - स्वारगेट येथून ये-जा करणाऱ्या पीएमपी, एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम चोरली जात आहे. मागील चार-पाच दिवसांत चोरट्यांनी महिला प्रवाशांकडील तब्बल आठ लाख रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी स्वारगेट, बंडगार्डन, अलंकार, शिवाजीनगर पोलिसांकडे असंख्य प्रवाशांकडून चोरीच्या तक्रारी दाखल केल्या जातात. पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असताना चोरट्यांनी मात्र चोरीचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे.

घटना वाढताहेत
धानोरी रस्ता परिसरातील ३९ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी ११ डिसेंबरला दुपारी दीड वाजता स्वारगेट-मनपा या बसने जात होत्या. स्वारगेट बसथांबा ते नेहरू स्टेडियम चौकीदरम्यान बस आली. त्या वेळी फिर्यादी यांनी खांद्याला अडकविलेल्या छोट्या बॅगेची अज्ञात व्यक्तीने चेन उघडली. त्यामधील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

लोणावळा येथील ५० वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिसांकडे नुकतीच फिर्याद दाखल केली. फिर्यादी २० डिसेंबरला सकाळी पावणेदहा वाजता शिवाजीनगर-स्वारगेट पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. त्या वेळी त्यांच्या पर्समधील ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. 

दिघी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादी शनिवारी दुपारी दोन वाजता स्वारगेट-आळंदी या बसने कुटुंबासह प्रवास करत होत्या. त्या वेळी त्यांच्याजवळील पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे होती. रोख रक्कम असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय महिलेने अलंकार पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्या शनिवारी नाशिक-पुणे या शिवशाही बसने पुण्याला आल्या. प्रवासादरम्यान त्यांची बॅग चोरट्यांनी पळवून नेली. त्यामध्ये हिरे, सोने-चांदीचे दागिने, रोख रकमेसह पाच लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज होता.

शिवाजीनगर-स्वारगेट बसने प्रवास करत असताना मी तिकिटासाठी पैसे काढले. त्यानंतर गर्दीमधीलच काही जणांनी माझ्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरली. माझ्याप्रमाणेच अनेक प्रवाशांकडील वस्तूंची याच पद्धतीने बसमधील चोरट्यांकडून चोरी केली जाते.
-एक महिला प्रवासी. 

प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यामध्ये एक पोलिस निरीक्षक व ४ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित पथक बसथांब्यांच्या परिसरात २४ तास कार्यरत आहे. याबरोबरच सकाळी व संध्याकाळी गर्दीच्यावेळी ६-६ कर्मचाऱ्यांकडूनही देखरेख केली जाते. प्रवाशांची लूट करणारी टोळी लवकरच हाती लागेल.
 - अशोक कदम, पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे.

Web Title: Thief Passenger Woman Target crime