कर्मचारी असल्याचे भासवून रुग्ण महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

गुडघ्याचे एक्‍सरे काढण्यासाठी त्या एक्‍सरे विभागाजवळ गेल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक व्यक्ती आला. त्याने स्वतःची ओळख रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना एक्‍सरे खोलीच्या दिशेने नेले....

पुणे : गुडगेदुखीमुळे रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका महिलेस रुग्णालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन एकाने एक्‍सरेच्या खोलीत जाण्यापुर्वी गळ्यातील सोन्याची साखळी काढण्यास सांगून ते लंपास केले. हा प्रकार शिवाजीनगर येथील एका नामांकीत खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. 

याप्रकरणी पिंपरी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय नागरीकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईला अनेक दिवसांपासून गुडगेदुखी व पाठदुखीचा त्रास सुरू आहे. त्यावर उपचार करण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या आई गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील एका नामांकीत खासगी रुग्णालयामध्ये आले होते. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार, गुडघ्याचे एक्‍सरे काढण्यासाठी त्या एक्‍सरे विभागाजवळ गेल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक व्यक्ती आला. त्याने स्वतःची ओळख रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना एक्‍सरे खोलीच्या दिशेने नेले. त्यानंतर त्याने महिलेला एक्‍सरे काढण्यापुर्वी गळ्यातील सोन्याची साखळी काढण्यास सांगितले. महिलेने सोन्याची साखळी काढून बाहेर बसलेल्या आपल्या मुलीकडे देण्यास सांगितले. बराचवेळ तो कर्मचारी आला नाही, त्यामुळे महिलेने बाहेर येऊन विचारणा केली, त्यावेळी संबंधीत व्यक्तीने फसवणूक करुन सोन्याची साखळी चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief stole a gold chain from womans neck by pretending to be an employee in pune