डेक्कन, शिवाजीनगर, कोंढवा परिसरात एकाच दिवशी घरफोड्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

शहराच्या उपनगरांप्रमाणेच मध्यवस्तीमध्येसुद्धा घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी डेक्कन, शिवाजीनगर, कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या.

पुणे : शहराच्या उपनगरांप्रमाणेच मध्यवस्तीमध्येसुद्धा घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी डेक्कन, शिवाजीनगर, कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या. याप्रकरणी डेक्कन, शिवाजीनगर व कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
श्‍वेता पाटील (वय 29, रा. ऍटलांटा, हिंजवडी रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या वहिनी जुई पाटील, त्यांची बहीण सई देशमुख व काका हेमंत देशमुख यांचे शिवाजीनगर रस्त्यावरील घोले रस्त्यावरील रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये स्वतःच्या सदनिका आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे नातेवाईक सदनिकांना कुलूप लावून बाहेर गेले होते. फिर्यादी या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेल्या, त्या वेळी त्यांच्या नऊ व दहा क्रमांकाच्या सदनिकांचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरात घुसून घरफोडीचा प्रयत्न केल्याचे आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. 
दरम्यान, अमोल संभार (वय 37, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे डेक्कन येथील आपटे रस्त्यावरील वेंकटेश व्हिला अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. शनिवारी पहाटे त्यांचे कार्यालयाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कार्यालयामध्ये घुसत चोरीचा प्रयत्न केला आहे.
 
प्रिया होळकर (वय 34, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) यांची कोंढवा बुद्रुक रस्त्यावरील टिळेकरनगरमधील बरसाना अंगन या सोसायटीमध्ये स्वतःच्या मालकीची सदनिका आहे. 28 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत फिर्यादी बाहेरगावी गेल्या होत्या. या कालावधीमध्ये चोरट्यांनी फिर्यादीच्या सदनिकेचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. 

Web Title: Thieves in the same Day Deccan Shivajinagar Kondhwa area