

नवी दिल्ली, ता. १५ ः बंगालच्या उपसागरात तीन आठवड्यांत तिसऱ्या चक्रीवादळाची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या (ता.१६) दक्षिण आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी (ता.१७) त्याची तीव्रता वाढून तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.
हवामान खात्याने ‘एक्स’वर म्हटले आहे, की ईशान्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. सध्या ही प्रणाली पोर्टब्लेअरमधील श्रीविजयपूरमपासून पश्चिम-नैऋत्येला ७०० कि.मी.वर, चेन्नईच्या पूर्व-आग्नेय दिशेला ८६० कि.मी.वर तर विशाखापट्टणमपासून दक्षिण-आग्नेयला १,०४० कि.मी.वर आणि गोपाळपूर (ओडिशा) पासून १,१६० कि.मी.वर आहे. ही प्रणाली उत्तर-वायव्य दिशेला सरकताना सोमवारी तीव्रता वाढून चक्रीवादळात व मंगळवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशला ‘अर्णव’ व ‘मुरासू’ ही दोन चक्रीवादळे नुकतीच धडकली होती. त्यानंतर तीन आठवड्यांत या तिसऱ्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले, की हे चक्रीवादळ उत्तर आंध्रच्या किनाऱ्याजवळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचाही सल्ला दिला आहे. आंध्रात दोन चक्रीवादळांमुळे किमान १५ जणांचा मृत्यू झाला तर रस्ते, वीजसेवेचेही मोठे नुकसान झाले.
ओडिशात अतिदक्षतेचे आदेश
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशात सर्व जिल्ह्यांना अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीच्या दोन चक्रीवादळांमुळे ओडिशात मोठी हानी झाल्याने खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. चक्रीवादळ नेमके कोठे धडकणार, याचा अंदाज हवामान खात्याने अद्याप दिला नसला तरी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येईल, तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफची पथकेही तैनात केली जातील, असे ओडिशाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले.