‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश

Thirty-First
Thirty-First

महापालिकेचा आदेश; हॉटेल आणि होम डिलिव्हरी सुविधेवरही मर्यादा
पुणे - कोरोनाचा धोका लक्षात घेऊन यंदा नवीन वर्षाच्या स्वागतावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संचारबंदी लागू असल्याने पुणेकरांना थर्टी फर्स्ट गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेपर्यंतच साजरी करता येणार आहे. ३१ डिसेंबरला हॉटेल आणि होम डिलिव्हरी सुविधाही पावणेअकरा वाजताच बंद होईल, असे आदेश पुणे महापालिकेने काढले आहेत.

ब्रिटनमध्ये वाढलेल्या कोरोनामुळे पुण्यात यापूर्वीच रात्री अकरानंतर संचारबंदी लागू केली आहे. पण, थर्टी फर्स्टला काय होणार? याबाबत उत्सुकता होती. यासंदर्भात महापालिकेने आज आदेश काढून ३१ डिसेंबरबाबत विविध निर्बंध लागू केले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच १ जानेवारीच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच सेलिब्रेशन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार यांच्यासोबत होम डिलिव्हरीवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या वर्षात मंदिरांमध्ये दर्शनाला गर्दी करण्यावरही बंधने आहेत. या निर्णयाबद्दल हॉटेलचालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पुणे रेस्टॉरंट असोसिएशनचे (पूर्व भाग) अध्यक्ष बाळासाहेब अमराळे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या आदेशाचा आम्हाला आदर आहे. मात्र, त्याचा हॉटेल चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. लॉकडाउनमध्ये एवढे महिने व्यवसाय बंद होता. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने आमचा चांगला व्यवसाय होतो. त्यामुळे त्यावर अशी बंधने टाकणे योग्य नाही. त्यातून सरकारचा महसूल आणि आमचे उत्पन्न बुडणार आहे. दिवसा सर्वत्र गर्दी होतेच ना; मग रात्रीची एवढी बंधने का? महापालिकेने या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. आम्ही कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच व्यवसाय करीत आहोत.’

अशी आहे महापालिकेची नियमावली

  • महापालिका हद्दीतील उद्याने, मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर आदींचा कटाक्षाने वापर करावा.
  • ६० वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील बालकांनी घराबाहेर जाणे टाळावे 
  • कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकीचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • महापालिका क्षेत्रामधील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार रात्री १०.४५ पर्यंतच सुरू राहणार आहेत. होम डिलिव्हरी सुविधाही रात्री १०.४५ वाजता बंद राहील. 
  • नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक धार्मिकस्थळी जातात. अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
  • फटाक्‍यांची आतषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करावे.
  • राज्याच्या गृह मंत्रालयाने २८ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.

नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता प्रत्येकाला असणे साहजिकच आहे. पण, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच हे नियम लागू केले आहेत. त्याचे पुणेकर पालन करून कोठेही गर्दी करणार नाहीत, याची खात्री आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही कारणासाठी गर्दी न करणेच योग्य आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री पाळलीच पाहिजे. कोणत्याही आजाराची लक्षणे असतील तर शक्‍यतो थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडू नये.
- डॉ. शिशिर जोशी, जनरल फिजिशिअन

कोरोनाने यंदा सर्वच गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्ट घरीच कुटुंबासोबत साजरा करणार आहे. महापालिकेने घातलेले निर्बंध आपल्याच सुरक्षिततेसाठी आहेत, त्याचे पालन करायलाच हवे.
- अश्‍विनी कुलकर्णी, अभिनेत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com