वढूतून बेपत्ता झालेला मुळशीतील रियल इस्टेट व्यवसायिक ११ दिवसांनंतर...

crime
crime
Updated on

कोरेगाव भीमा (पुणे) : शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथून बेपत्ता झालेल्या मुळशी तालुक्यातील जवळ येथील गजानन ज्ञानोबा घारे यांचा ११ दिवस उलटूनही अद्याप तपास लागला नाही. मात्र, त्यांच्या अपहरणप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक  केलेल्या न्हावी सांडस (ता. हवेली) येथील महाराजांसह तिघांविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. य़ा तिघांनाही येत्या १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज न्यायालयाने दिला आहे. 

या प्रकरणी सौ. छाया लोले यांच्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार वढू बुद्रुक येथील छाया लोले यांचा भाऊ गजानन ज्ञानोबा घारे (रा. जवळगाव, ता. मुळशी) यांना ईश्वर शिवाजी ढगे (रा. आपटी, ता. शिरूर) याने २९ मे रोजी सायंकाळी फोन करून कोरेगावात बोलावून घेतले होते. त्यानंतर रात्री गजानन हे परत आले नाही. तसेच, त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या बहिणीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

दरम्यान, गजानन यांच्याबाबत अजित पांडूरंग शितोळे- महाराज (रा. न्हावी सांडस), ईश्वर ढगे व रोहिदास राघुजी गायकवाड (रा. उरुळी कांचन) या तिघांकडे विचारणा केली. त्यांनी गजानन यांना रात्री परत कोरेगावात आणून सोडल्याचे सांगितले. मात्र, त्या तिघांवरच संशय बळावला. त्यामुळे सौ. लोले यांनी त्यांच्या विरोधात रितसर शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी पांडूरंग शितोळे महाराज, ईश्वर शिवाजी ढगे व रोहिदास राघुजी गायकवाड या तिघांनाही अटक करून शिरुर न्यायालयाच्या आदेशानुसार पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवले होते. 

दरम्यानच्या अधिक चौकशीत रियल इस्टेटचा व्यवसाय असलेल्या गजानन घारे यांचे मोठ्या प्रमाणावर अडकलेले पैसे काढून देण्यासाठी या महाराजाने पूजा व जादुटोण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळल्याचीही माहिती पुढे आली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी या महाराजांसह तिघांविरोधात काल फसवणूक व जादुटोणाप्रकरणीही अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आज शिरुर न्यायालयाने या महाराजासह एकुण तिघांनाही पुन्हा येत्या १२ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, अपहरण झालेल्या गजानन घारे यांचा ११ दिवस उलटूनही अद्याप तपास लागला नाही. त्यामुळे या प्रकरणी कुटूंबांची चिंता वाढली असून, सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर हे सखोल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com