esakal | दौंड येथे रेमडेसिवीर विक्री प्रकरणी तिघांना अटक; 9 इंजेक्शन जप्त

बोलून बातमी शोधा

crime
दौंड येथे रेमडेसिवीर विक्रीप्रकरणी तिघांना अटक; 9 इंजेक्शन जप्त
sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : कोरोना बाधितांवरील उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनची पुणे जिल्ह्यात वाढीव दराने विक्री करणार्या तीन तरूणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवैध मार्गाने कोणताही परवाना नसताना तिघे प्रत्येक इंजेक्शन बत्तीस ते पंचेचाळीस हजार रूपयांच्या दरम्यान विकत होते. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिल्यानंतर पथके नियुक्त करण्यात आली होती.

पथकांना दौंड व जुन्नर तालुक्यात वाढीव दराने या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधितांवर पाळत ठेवली. पुणे येथून रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणून त्याची दौंड शहर व परिसरात अक्षय राजेश सोनवणे (वय २४, रा. श्री विठ्ठल मंदिरामागे, दौंड) व सुरज संजय साबळे (वय २३, रा. श्री स्वामी समर्थ मंदिराच्या मागे , दौंड) हे प्रत्येकी बत्तीस हजार रूपयांना विकत होते. पोलिसांनी पाळत ठेवून दोघांना दौंड शहरातील हुतात्मा चौकात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा इंजेक्शन, मोबाइल संच आणि दुचाकी, असा एकूण ९७ हजार ८७९ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अक्षय सोनवणे हा एका खासगी पॅथोलॅाजी लॅब मध्ये कामाला होता. नारायणगाव जवळ वारूळवाडी येथील गुरूवर्य सबनीस विद्यालयासमोर रोहन शेखर गणेशकर (वय २९, रा. वाणेवाडी, ता. जु्न्नर ) हा तरूण प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपयांना इंजेक्शनची विक्री करीत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन इंजेक्शन आणि अन्य साहित्य, असा २१ हजार ८९० रूपयांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

अधीक्षक अभिनव देशमुख, अपर अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह सहायक निरीक्षक सचिन काळे, फौजदार अमोल गोरे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, दत्ता तांबे, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजापुरे, पोलिस नाईक गुरू गायकवाड व दगडू वीरकर यांनी कारवाईत भाग घेतला.

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय