
विद्युत मोटार चोरी करणाऱ्या तिघांना अटक
इंदापूर - इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिर तसेच इतर ठिकाणच्या विद्युत मोटार चोरी करणाऱ्या तिघांना इंदापूर पोलीसांनी अटक केली. राहुल सावताराम भोंग (रा. काटी ता. इंदापूर जि. पुणे), कमलेश उदयराज यादव व प्रविणकुमार दुर्गाप्रसाद यादव (दोघे रा. उत्तरप्रदेश) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांनी एकूण ११ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपींनी वडापुरी, बावडा, गिरवी, गोखळी, रेडा, रेडणी, निमगाव केतकी येथे चोऱ्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलीसांनी विद्युत मोटारी, केबल्स,कटर व चोरलेल्या ७ मोटारी विकून आलेले १६ हजार रुपये, असा एकूण एक लाख चार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी जाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार खास पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
या पथकाने गोपनीय माहितीव्दारे प्रथम एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने राहुल भोंग याच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरल्याचे सांगितले.पोलीसांनी राहुल भोंग यास अटक करुन अधिक तपास केला असता त्याने कमलेश यादव व प्रविणकुमार यादवयाच्या मदतीने या चोऱ्या केल्याचे उघड झाले.
बारामती अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, सहाय्यकपोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, अपर्णा जाधव, संजय धोत्रे, सहाय्यक फौजदार कचरु शिंदे, सतीश ढवळे, पोलीस हवालदार पवन भोईटे, श्री. गायकवाड, अमोल खैरे, पोलीस नाईक बापू मोहिते, सलमान खान, अमोल गायकवाड, श्री. कळसाईत, पोलीस शिपाई विशाल चौधर, अर्जून नरळे व विकास राखुंडे या पथकाने ही कामगिरी केली.
Web Title: Three Arrested For Stealing Electric Motor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..