मेक्‍सिकोतून मिळविले तीन कोटी ४१ लाख परत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

खासगी कंपनीस बनावट ई-मेल पाठवून तीन कोटी ४१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा मेक्‍सिको येथील बॅंकेशी पत्रव्यवहार करून सायबर पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीने लंपास केलेली सर्व रक्कम परत मिळविली.

पुणे- खासगी कंपनीस बनावट ई-मेल पाठवून तीन कोटी ४१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा मेक्‍सिको येथील बॅंकेशी पत्रव्यवहार करून सायबर पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीने लंपास केलेली सर्व रक्कम परत मिळविली. हा प्रकार मागील महिन्यामध्ये घडला होता.

याप्रकरणी एसआरसी केमिकल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरसी केमिकल कंपनीस १४ व १८ जून रोजी त्यांचा व्यवहार असणाऱ्या एका कंपनीस ठराविक रक्कम पाठविण्यासंदर्भात ई-मेल आला होता. त्यानुसार कंपनीने त्यांच्या एचडीएफसी बॅंकेच्या खात्यातून तीन कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम मेक्‍सिको येथील बॅंको मर्कंटाईल डेल नॉर्टे (बेनॉर्टे) या बॅंकेमध्ये पाठविली होती. त्यानंतर कंपनीस पैसे मिळाल्याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत चौकशी केल्यानंतर बनावट ई-मेलद्वारे ही रक्कम अन्य व्यक्तींनी (मॅन ईन मिडल) लंपास केल्याचे निदर्शनास आले, त्यानुसार कंपनीने तत्काळ शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. 

दरम्यान, सायबर पोलिसांनी मेक्‍सिकोमधील बॅंको मर्कंटाईल डेल नॉर्टे (बेनॉर्टे) या बॅंकेसह तक्रारदाराचे बॅंक खाते असलेली एचडीएफसी बॅंकेशी पत्रव्यवहार केला. तसेच हा आर्थिक व्यवहार जे. पी. मॉर्गन बॅंकेच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्याकडेही पुरावे पाठवून पत्रव्यवहाराद्वारे हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानुसार ११ जुलै रोजी एसआरसी केमिकल कंपनीची ऑनलाइन पद्धतीने लंपास केलेली तीन कोटी ४१ लाखांची रक्कम परत मिळविण्यात यश आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three core fourty one million returning from Mexico