जुन्नर : माणिकडोह धरणात होडी उलटून तिघांचा मृत्यू

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 24 मे 2019

- होडी उलटल्याने झाली ही दुर्घटना.

जुन्नर : माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रातील केवाडीजवळ मासे आणण्यासाठी जात असताना होडी उलटल्यामुळे तीन आदिवासी तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता.२४) सकाळी घडली.

गणेश भाऊ साबळे (वय 25), स्वप्निल बाळू साबळे (वय 21, रा. निमगिरी) आणि पंढरीनाथ मारुती मुंढे (वय 31, रा. पेठेचीवाडी, ता.जुन्नर) अशी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 
पुण्याहून 'एनडीआरएफ'च्या जवानांना पाचारण केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. 

याबाबतची माहिती अशी की, केवाडी येथे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील आठजण सकाळी नऊच्या सुमारास होडीने जात होते. त्यांचा भार सहन न झाल्याने होडी उलटली. त्यातील तीनजण पाण्यात बुडाले, तर पाचजण पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, त्यांना शोध कार्यात अपयश आल्याने पुण्यावरून 'एनडीआरएफ'च्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पाणबुडीच्या सहाय्याने शोध घेऊन अवघ्या दहा मिनिटात मृतदेह बाहेर काढले. 

या परिसरात मोबाईलला रेंज नसल्याने घटनेची माहिती प्रशासनाला कळण्यास विलंब झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. सकाळी अकराच्या सुमारास निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार हनुमंत कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे घटनास्थळी उपस्थित होते.

या घटनेने निमगिरी व राजूर गावांवर शोककळा पसरली आहे. यासारख्या घटनांमुळे धरणक्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने प्रशासनाने योग्य उपाय त्वरित करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी केली आहे. संपर्क यंत्रणेच्या अभावामुळे मदतकार्यात अडथळा घटनास्थळाजवळ तसेच आदिवासी भागातील वर्षानुवर्षे मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क यंत्रणेचा अभाव निर्माण होत असून, अशा घटनांमध्ये मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधींनी या भागात मोबाईल टॉवर कार्यान्वित करावेत, अशी मागणी गावकरी करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Died in Manikdoh Dam after Boat Collapsed