देवांच्या मूर्ती, दागिने घडविणाऱ्या तीन पिढ्या

देवाच्या मूर्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण मुकुट घडवताना कारागीर नितीन करडे.
देवाच्या मूर्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण मुकुट घडवताना कारागीर नितीन करडे.

अनंत दत्तात्रेय करडे व त्यांचे चिरंजीव नितीन आणि आता पुढच्या पिढीतील नीरज हे देवादिकांच्या मूर्ती, प्रभावळ, आयुधे, आभूषण आदी घडवणारे कारागीर. ही पारंपरिक कला यांच्यापैकी प्रत्येकाने काळानुरूप नवे बदल करत पुढे नेली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देवदेवतांच्या मूर्तींकडे डोळे भरून पाहणाऱ्याची दृष्टी अनेक गोष्टींकडे खिळून राहते. मूर्तीच्या डोक्‍याच्या मागच्या बाजूस असलेली प्रभावळ (तेजोवलय), आयुधे, आभूषणे आदी घडवणे हे कारागिरांसाठी अत्यंत आव्हानाचे असते. पारंपरिक संकेत पाळून काही तरी वैशिष्ट्यपूर्ण घडवायची ओढ असते.

नितीन करडे म्हणाले, ‘‘आम्ही मूळचे कोकणातील महाडचे, पण वर्षानुवर्षे पुण्यात स्थायिक झालेलो. तांबे व पितळीच्या कलात्मक वस्तू घडवणे हा आमच्या कुटुंबाचा व्यवसाय. घरातील देव्हारे, त्यांतील देवांच्या मूर्ती व चौरंग आमच्याकडे घडवले जात. देवळांमधील पंचधातूच्या मूर्ती व प्रभावळी तयार करण्याचं काम चालायचं. वडिलांच्या कलाशिक्षणामुळे त्यात नावीन्य, वेगळेपणा आला. काही व्यापाऱ्यांनी विचारले की, चांदीत ही कारागिरी कराल का? तेव्हा आम्ही चांदीत काम करू लागलो. मी ड्राफ्ट्‌समनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. काही घडवायचे असेल तर आधी त्यासाठीचे आरेखन करून, त्याबरहुकूम काम केल्यास अचूकपणे कलाकृती दर्जेदार व्हायला मदत होते. वडिलांची सर्जनशीलता व माझे आरेखनाचे कौशल्य, हे परस्परपूरक झाले.

आता माझा मुलगा नीरज ॲनिमेशन शिकला असल्याने, त्रिमिती परिणाम साधण्यासाठी त्याचे ज्ञान उपयोगी पडू लागले आहे. माझे वडील अकरा वर्षांपूर्वी गेले, पण त्यांनी शिकवलेली कलाविषयक मूल्ये आमच्या सोबत आहेत.’’

करडे यांनी असंही सांगितलं की, पुण्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरातील मूर्तींशी संबंधित काम मी केलं आहे. अक्कलकोट, गाणगापूर व जेजुरी आदी ठिकाणच्या देवालयांमध्येही माझ्या हातून सेवा घडली आहे. देवादिकांच्या हातांतील परशू, त्रिशूळ, गदा आदी आयुधे तसेच हार, कंबरपट्टा, बाजूबंद, तोडे यांसारख्या आभूषणांचे काम आणि नयनरम्य प्रभावळी तयार करताना आमची कला आणि सेवा यांच्यात विलक्षण अद्वैत निर्माण होते. तो अनुभव शब्दांत पकडणे अशक्‍य आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com