मसाज सेंटरमधून तीन तरुणींची सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पिंपरी - चिंचवडगावातील गावडे बिल्डिंगमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांच्या सामाजिक विभागाने छापा टाकला. 

पिंपरी - चिंचवडगावातील गावडे बिल्डिंगमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांच्या सामाजिक विभागाने छापा टाकला. 

या सेंटरमधून तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, सेंटर मालकाला अटक केली आहे. अविनाश देविदास जोगदंड (वय २२, रा. सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, निगडी) असे अटक केलेल्या स्पा मसाज सेंटर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड हा मसाज सेंटरमध्ये ठेवलेल्या थेरपिस्ट महिलांकडून मसाजच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार या शुक्रवारी या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. तेथून नेपाळची एक आणि पुणे शहरातील दोन अशा तीन तरुणांची वेश्‍या व्यवसायातून सुटका केली. जोगदंड याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव टेंपोने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे घडली. संदीप जनार्दन घाडगे (वय ३१, रा. सुताटिक कांदळी, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. पोलिस हवालदार काळे यांनी दिघी पोलिस ठाण्यात अज्ञात टेंपोचालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. घाडगे १६ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास आळंदी-दिघी रोडने चालले होते. ते दिघीतील एआयटी कॉलेजजवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या टेंपोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेंपो चालक पळून गेला. जखमी झालेल्या घाडगे यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

पिंपरीत 26 हजारांची चोरी
उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप व घड्याळ असा २६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ एप्रिलला सकाळी साडेसहा ते पावणे नऊच्या दरम्यान घडली. महेश लक्ष्मण पैठणे (वय २२, रा. लक्ष्मी सोसायटी, महेशनगर सोसायटी, संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: three girls release in massage center crime