बिबट्याच्या हल्ल्यात बेल्ह्यात ३ शेळ्या ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथील शिवनेरवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन, तर तांबेवाडी येथे एक शेळी ठार झाली.

आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) येथील शिवनेरवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन, तर तांबेवाडी येथे एक शेळी ठार झाली.

बेल्हे येथील शिवनेरवाडी परिसरात भास्कर गुंजाळ यांच्या घराशेजारी त्यांचा जनावरांचा गोठा आहे. गोठ्यास बाजूने पाचटाच्या ताट्या लावल्या आहेत. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्याने पाचटाची ताटी तोडून गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. यात दोन शेळ्या ठार झाल्या. यापैकी एक शेळी मृतावस्थेत जागेवर आढळली, तर दुसरी बिबट्याने ठार मारून सुमारे पाचशे फुटावरील उसाच्या शेतात नेऊन फस्त केली. शेळी उसात ओढून नेल्याची फरपट पडल्याचे आढळून आले. तसेच बिबट्या मृत शेळीस ओढून नेताना गुंजाळ यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, तांबेवाडी येथे रविवारी मध्यरात्री भिकाजी तुकाराम तांबे यांची अंदाजे दोन वर्षांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. या दोन्ही घटनांचा प्रभारी वनपाल डी. डी. फापाळे व वन कर्मचारी जे. टी. भंडलकर यांनी पंचनामा केला आहे. शिवनेरवाडी परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने ठकसेन शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Three goats killed in leopard attack