अजितदादांकडून बारामतीतील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा

मिलिंद संगई
Saturday, 8 August 2020

बारामती शहरातील कोरोना रुग्णांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन्स आज रुई येथे कार्यान्वित करण्यात आल्या.

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोना रुग्णांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन्स आज रुई येथे कार्यान्वित करण्यात आल्या. बारामतीतील रुई रुग्णालयाच कोविड हेल्थ सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ज्या रुग्णांना दाखल करण्यात येते, त्यापैकी काहींना जर ऑक्सिजनची गरज भासली, तर या हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीनचा वापर केला जाणार आहे. 

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा लाख रुपये या तीन मशीन्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. ज्या रुग्णांना मास्कच्या ऑक्सिजन यंत्रणेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हाय फ्लो नेझल मशीन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर

दरम्यान, एमआयडीसीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या तीन इमारती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अधिग्रहीत केल्या आहेत. या एका वसतिगृहात 54 व्यक्ती राहू शकतात. तीन इमारती मिळून या ठिकाणी 162 रुग्ण राहू शकतील. या पध्दतीने ज्यांना लक्षणे नाहीत, मात्र जे पॉझिटिव्ह आहेत असे, त्याच प्रमाणे ज्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेतले जातील, त्यांनाही रिपोर्ट येईपर्यंत याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बारामतीकरांचीही उत्तम सोय येथे होणार आहे. 

अजित पवार यांचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज बारामतीत घेतलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे आवाहन केले. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three high flow nasal oxygen machines for corona patients in Baramati city