जेजुरी-नीरा रस्त्यावरील अपघातात तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

जेजुरी/वाल्हे - जेजुरी-नीरा रस्त्यावर पिंपरे गावच्या हद्दीत जेऊर फाट्यावर रविवारी (ता. २४) सकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन मोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार, तर नऊ जण जखमी झाले. अपघातात एका डॉक्‍टरचा व तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

जेजुरी/वाल्हे - जेजुरी-नीरा रस्त्यावर पिंपरे गावच्या हद्दीत जेऊर फाट्यावर रविवारी (ता. २४) सकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन मोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार, तर नऊ जण जखमी झाले. अपघातात एका डॉक्‍टरचा व तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सत्येन हकुमचंद दोभाडा (रा. वैभव टॉकीज, सावली कॉर्नर, हडपसर), अनंत गणपत चांडोले (वय ३७, रा. वेळापूर, ता. माळशिरस), अंजली अनिल भानवसे (वय ३, रा. सौंदणे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. सोमनाथ विठ्ठल मोहिते (वय २२, रा. पिसेवाडी वेळापूर, ता. माळशिरस), रंजना विठ्ठल मोहिते, आशा अनिल भानवसे (वय २२, रा. सौंदणे, ता. मोहोळ, जि. सोलापूर), दीपाली गणेश जाधव (वय २४, रा. माळवाडी, ता. माळशिरस), अबोली ऊर्फ राणी अप्पा लोखंडे (वय २६), अप्पा दत्तात्रेय लोखंडे (वय ३०), साक्षी अप्पा लोखंडे (वय ८), गणेश अप्पा लोखंडे (वय ६, रा. सर्व वेळापूर, ता. माळशिरस), बापू रोहिदास कांबळे (वय ४१, रा. कोथरूड पुणे) आदी जखमी झाले आहेत. जेजुरी व लोणंद येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सकाळी सौंदणे (ता. मोहोळ), माळवाडी व वेळापूर (ता. माळशिरस) येथील भानवसे, लोखंडे, जाधव हे एकमेकांचे नातेवाईक जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी येत होते. पहाटे साडेतीन वाजता मारुतीच्या इको गाडीने जेजुरीकडे निघाले होते. नीरेकडून जेजुरीकडे येताना पिंपरे गावच्या हद्दीत पावणेसहाच्या सुमारास समोरून येणाऱ्या इलेक्‍ट्रा होंडा मोटारीने यांची धडक झाली. अपघात इतका भयानक होता की दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले. दोन्ही मोटारीतील सर्व जखमी झाले. डॉ. दोभाडा हे लोणंद येथे शस्त्रक्रियेसाठी जात असल्याचे समजले. तर इको गाडीतील प्रवासी जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येत होते. अपघाताची माहिती समजताच जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्यासह वाल्हे व नीरा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जेजुरी व लोणंद येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष
गुळुंचे - जेऊर फाट्याजवळ दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बेफिकिरीने वाहन चालवणे, अरुंद रस्ता, रेल्वे क्रॉसिंग, खचलेल्या साइडपट्ट्या तसेच रस्त्यावर सांडलेले तेल व वंगणयुक्त पदार्थांमुळे अपघात होत आहेत. हा भाग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या रुंदीकरणाची यापूर्वी मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

Web Title: Three killed in road accidents