पवारसाहेबांची मोठी खेळी, होम पीचवरील कट्टर विरोधकांनी धरल्या तीन वाटा  

संतोष शेंडकर
Tuesday, 4 August 2020

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मागील काही महिन्यांत राज्यासोबत आपल्या घरच्या साखरपट्ट्यातही लक्ष घातले आहे. त्यांच्या 'डीनर डिप्लोमसी'ने सोमेश्वर आणि छत्रपती या दोन्ही कारखान्यांवरील विरोधकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे पवार यांच्या विचारांच्या कारखान्यांपैकी आता फक्त त्यांच्या अंगणातल्या माळेगाव साखर कारखान्यावरच सबळ विरोधक उरला आहे

सोमेश्वरनगर (पुणे) : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मागील काही महिन्यांत राज्यासोबत आपल्या घरच्या साखरपट्ट्यातही लक्ष घातले आहे. त्यांच्या 'डीनर डिप्लोमसी'ने सोमेश्वर आणि छत्रपती या दोन्ही कारखान्यांवरील विरोधकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे पवार यांच्या विचारांच्या कारखान्यांपैकी आता फक्त त्यांच्या अंगणातल्या माळेगाव साखर कारखान्यावरच सबळ विरोधक उरला आहे. तसेच, भैय्या-बापू-काका यांचे एकेकाळचे 'त्रिकूट'ही आता राजकीयदृष्ट्या विभागले गेले आहे. 

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

बारामती तालुक्यातील माळेगाव, सोमेश्वर आणि इंदापूर तालुक्यातील छत्रपती हे तीन कारखाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरचेच कारखाने मानले जातात. माळेगाव थेट घरासमोरचा, छत्रपतीची तर पवारांशी तीन पिढ्यांची नाळ आहे आणि सोमेश्वरही सन १९९२ पासून पवारांच्याच ताब्यात आहे. सध्याही या तीन कारखान्यांवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचीच निर्विवाद सत्ता आहे. तीनही कारखान्यांमध्ये अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते, पवारांचाच शब्द प्रमाण असतो. कारखाने अडचणीत आल्यावर तारणहार अजित पवारच असतात. परंतु, यासोबत या तीनही कारखान्यांवर पवारांचे मातब्बर विरोधकही आहेत. वास्तविक हे तीनही विचारांचेच कारखाने असताना कारखानदारीतले सर्वाधिक प्रबळ विरोधकही याच कारखान्यांवर होते. याच तीन कारखान्यांच्या निवडणुका व वार्षिक सभा तर लक्षवेधी होतातच. पण, याच तीन कारखान्यांवर आंदोलनेही तीव्र होत होती. 

सोमेश्वर कारखान्यावर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे होते, तर माळेगावला रंजन तावरे आणि छत्रपतीला पृथ्वीराज जाचक हे होते. तिघांनी आंदोलनासोबत निवडणुकांमध्येही आपली ताकद पणाला लावली होती. सन २००२ पासून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बलशाली पॅनेलला सतीश काकडेंनी जोरदार टक्कर दिली होती.  तेव्हापासूनच छत्रपती कारखान्यावर पृथ्वीराज जाचक यांनी तिन्ही निवडणुका गाजविल्या होत्या. मात्र, दोघांना आंदोलनात यश यायचे आणि निवडणुकीत अपयश. दुसरीकडे माळेगावला रंजन तावरेंना मात्र यश आले. रंजन तावरे यांनी आपले गुरू चंदरराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल टाकून सन २०१४ मध्ये माळेगावची सत्ता खेचून आणली. पवारांच्या दारासमोरचा कारखाना विरोधकाच्या ताब्यात गेला, हे राज्याने पाहिले. 

दुसरीकडे सोमेश्वर आणि छत्रपती अलगद अजित पवार यांनी ताब्यात घेतले. मागील पाच वर्ष गुरू-शिष्यांनी कारखाना सतत गाजवत ठेवला आणि राज्यातील सर्वोच्च भावही दिला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मात्र, अजित पवार यांनी सर्व ताकद पणाला लावली. 'साहेबांच्या घरातून कारखान्याची चिमणी दिसते. तो कारखाना साहेबांच्या विचारांचा असावा' असा सल बोलून दाखविला. त्यामुळे हा कारखानाही अजित पवार यांच्या ताब्यात आला. आता सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्याच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत. वास्तविक सध्या मात्र, दोन्ही कारखान्यांवर राष्ट्रवादीच ताकदवान आहे आणि पॅनेल निवडून येण्यातही अडचण नाही. परंतु, तरीही पवार यांनी बेरजेच्या राजकाऱणास प्राधान्य देत विरोधच नको, अशी भूमिका घेतल्याचे दिसते. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

सतीश काकडे यांच्या निमंत्रणावरून दीड वर्षापूर्वी अजित पवार त्यांच्या निंबूत गावात उद्घाटनांसाठी गेले. सतीश काकडे यांनी काकडे-पवार वाद संपवत असल्याचे जाहीर केले. यानंतर नुकतेच सतीश काकडे हे राजू शेट्टींसोबत पवार यांच्याशी चर्चेसाठी गेले होते. पवारांच्या आपुलकीने आणि शेतीचे प्रयोग पाहून ते भारावून गेले. काकडेंचा वाढदिवस असल्याचे कळताच पवार यांनी, 'आता जेवूनच जा' असा आग्रह धरला. या तीन तासांच्या डीनर डिप्लोमसीने सतीश काकडेंचे पूर्ण परीवर्तन झाले. पवार- काकडे वादाची पासष्ट वर्ष त्यात विरघळून गेली. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील हवा संपल्यात जमा आहे. 

आता छत्रपतीची निवडणूकही त्याच वळणावर गेली आहे. छत्रपती आर्थिक अडचणीत असून बाहेर पडण्यासाठी राजकीय वाद संपवून एकोप्याने चालवावा लागणार आहे. अन्यथा भाऊबंदकीत कारखाना अवसायनात जायला वेळ लागणार नाही. घरातल्या कारखान्याचे तीन तेरा वाजणे पवारांनाही रूचणारे नाही. जाचक यांनीही समजुतीची भूमिका घेत टोकाचा विरोध सोडून देत दोन पावले पुढे टाकली. अजित पवार यांनीही त्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने चाचपणी केली. मधल्या महिनाभरात पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, आज जाचकांची शरद पवार यांच्यासोबत सिल्व्हर ओक येथे झालेली भेट कारखान्याचे भविष्यच सांगून गेली आहे. पवार-जाचक यांच्यातीलही सतरा वर्षांचा दुरावा संपला आहे. पवारांनी जाचकांसोबत भोजन करून दीड तास सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे अजित पवारांनंतर साहेबांचाही हात पाठीवर पडला आहे. याचाच अर्थ माळेगावच्या लक्षवेधी रणधुमाळीनंतर सोमेश्वर आणि छत्रपतीची तापलेली हवा मात्र थंड झाली आहे. असे असले तरी किमान लोकशाहीचा संकोच होऊ नये इतकी जाणकार सभासदांची अपेक्षा आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या डिनर डिप्लोमसीतून केवळ कारखान्यांच्याच नव्हे तर अन्य निवडणुकाही पवार कुटुंबियांना सुकर होणार आहेत. विधानसभेसाठी अजित पवारांच्या दृष्टीने बारामती तर लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या दृष्टीने इंदापूर-बारामती हा 'ग्रीन झोन' होऊ शकेल अशीच ही पावले आहेत. असे असले तरी माळेगावच्या अंगणातल्या कारखान्यावर चंदरराव तावरे व रंजन तावरे हे मातब्बर विरोधक आहेतच. पॅनेलचा पराभव झाला असला, तरीही सर्वशक्तीनिशी लढलेल्या राष्ट्रवादीला या गुरूशिष्याचा पराभव मात्र करता आला नाही, हेही वास्तव आहे. त्यामुळे 'योग्य वेळ' येताच ते माळेगावच्या कार्यक्षेत्रापुरती तरी नक्कीच उचल खातील, अशी शक्यता आहे. सध्याच्या बेरजेच्या राजकारणात शेतकऱ्यांसाठी भांडणारे नेते संपून जाऊ नयेत, तसेच वार्षिक सभा, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरची चळवळही जिवंत रहावी, अशा अपेक्षाही शेतकरी व्यक्त करत आहेत.
    
याबाबत रंजन तावरे सकाळशी बोलताना म्हणाले की, आम्ही तिघेही मित्र आहोत. शेतकऱ्यांसाठी एकत्र आंदोलने करून महाराष्ट्र गाजविला आहे. परंतु, आता प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे. मी सत्तेत होतो, तेव्हा त्यांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या. आता त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छाच आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी सदैव कार्यरत राहणार, हा उद्देश आधीही आणि आजही समान आहे. माझ्याबाबत बोलायचे तर मला माळेगावच्या सभासदांनी विक्रमी मतांनी निवडून दिले आहे. साम, दाम, दंड, भेद यानंतरही अजित पवार माझा पराभव करू शकले नाहीत. सभासदांशी मी प्रतारणा करणार नाही.

भैय्या-बापू-काकाचे त्रिकूट
सतीश काकडे (भैय्या), पृथ्वीराज जाचक (बापू), रंजन तावरे (काका) यांच्या त्रिकुटाने सन २००२ पासून सन २०१४-१५ पर्यंत 'शेतकरी कृती समिती'मार्फत आंदोलने करून पवारांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. राजू शेट्टी, रघुनाथ पाटील अशा शेतकरी नेत्यांची साथ मिळाल्यावर तर भैय्या-बापू-काका यांच्या त्रिकुटाने अक्षरशः रान पेटविले होते. काटा बंद, धरणे, गव्हाणीत उडी अशी लक्षवेधी आंदोलने केली. राजू शेट्टींना बारामतीत येऊन बसायला याच तिघांनी बळ दिले. हर्षवर्धन पाटील, अजित पवार या ज्येष्ठ मंत्र्यांसोबत शरद पवार हेही या आंदोलनात लक्ष्य झाले होते. पवारांच्या विचारांच्या कारखान्यांना कोंडीत पकडले की राज्याचे, सरकारचे लक्ष जायचे. त्यामुळे त्रिकुट राज्यात प्रसिध्द झाले होते. २०१५ मध्ये रंजन तावरे विजयी होऊन माळेगावचे अध्यक्ष बनल्याने साहजिकच त्यांचे आंदोलन संपले. यानंतर बापू, भैय्या आपापल्या कारखान्यांवर लढतच होते. आता राजू शेट्टींपाठोपाठ बापू, भैय्या यांनीही सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेतले आहे. रंजन तावरे सत्तेच्या बाहेर पडले आहेत. आजही हे त्रिकूट मैत्रीत असले, तरी राजकीय दृष्ट्या विभागले गेले आहे. शेतकरी कृती समितीचेच तिघेही आजही नेते आहेत, पण त्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. एकदिलाची आंदोलने दिसत नाहीत. आता यापुढे सोमेश्वर, छत्रपतीच्या निवडणुकांनंतरच त्रिकूट टिकणार की विरघळून जाणार, हे समजणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three leaders split in opposition to Sharad Pawar