पुणे : मुळशी धरणात बुडून एमबीएच्‍या तीन विद्यार्थ्‍यांचा मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

पुणे : भारती विद्यापीठमध्ये एमबीए करणारे तीन विद्यार्थी मुळशी धरणात पोहण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडाल्याची माहिती गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान नागरिकांच्या सहकार्याने एका विद्यार्थीनीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.​

माले : मुळशी परिसरात फिरण्‍यासाठी आलेल्‍या तिन विद्यार्थ्‍यांचा मुळशी धरणाच्‍या पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला. वळणे (ता.मुळशी) येथे गुरुवार (ता.२) सकाळी साडेसात वाजताच्‍या दरम्‍यान ही घटना घडली. मृतांमध्‍ये एक तरुणी, दोन तरुणांचा समावेश आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत तिघांचेही मृतदेह हाती आले होते. तिघेही भारती विद्यापीठ कोथरुड येथे एमबीएचे शिक्षण घेत होते. 

संगीता नेगी (वय- 22, रा.दिल्‍ली), शिवकुमार (वय- 22, रा.उत्‍तर प्रदेश), शुभम राज सिन्‍हा (वय- 22, रा.पटणा, बिहार) सर्व सध्‍या राहणार कोथरुड या तिघांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, परिक्षा संपुन सुटटया लागल्‍यामुळे संगीता, शिवकुमार, शुभम असे एकूण दहा मित्र, मैत्रिणी मुळशी धरण परिसरात फिरायला आले होते. गुरुवारी (ता.2) पहाटे सात वाजताच्‍या दरम्‍यान वळणे गावच्‍या हददीत आल्‍यावर सर्वजण मुळशी धरणाच्‍या पाण्‍यात उतरुन पोहु, खेळु लागले. काही वेळाने संगीता खोल पाण्‍यात बुडू लागली. तिच्‍या जवळच असणारे शिवकुमार व शुभम हे तिला वाचवण्‍यासाठी प्रयत्‍न करु लागले. परंतु त्‍यात तिघांचाही बुडून मृत्‍यु झाला.

उर्वरित मित्र, मैत्रिणींनी पोलिसांना संपर्क करुन मदत मागविली. पौड पोलिस स्‍थानकाचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, मंगेश लांडगे, संजय सुपे आदींनी घटनास्‍थळी धाव घेतली. पौड पोलिस, मारुंजी येथील अग्निशमन दल, स्‍थानिक ज्ञानेश्‍वर भावेकर यांनी मृतदेह शोधले. सर्वांत प्रथम संगीता व त्‍यानंतर शिवकुमार, शुभम यांचे मृतदेह सापडले. सर्वजण कोथरुड येथील भारती विद्यापीठाच्‍या एमबीएचे शिक्षण घेत होते. पौड पोलिस पुढील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three MBA student from pune drowning in mulshi dam