तीन मेडिकलचा परवाना निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्यापेक्षा जास्त गोळ्या रुग्णांच्या माथी मारणाऱ्या तीन दुकानांचा औषध विक्री परवाना तीस दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी दिले. त्यात धायरी येथील पवन मेडिकल्स, विघ्नहर आणि लष्कर भागातील वेलनेस या औषध दुकानांचा समावेश आहे. 

पुणे - डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्यापेक्षा जास्त गोळ्या रुग्णांच्या माथी मारणाऱ्या तीन दुकानांचा औषध विक्री परवाना तीस दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी दिले. त्यात धायरी येथील पवन मेडिकल्स, विघ्नहर आणि लष्कर भागातील वेलनेस या औषध दुकानांचा समावेश आहे. 

डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या पाचऐवजी दहा गोळ्यांच्या खरेदीची सक्ती रुग्णांच्या नातेवाइकांवर औषध विक्रेत्यांकडून केली जात होती. रुग्णाच्या हतबलतेचा फायदा घेऊन भरमसाट नफा कमविण्याचा उद्योग औषध विक्रेत्यांनी सुरू केल्याची माहिती "सकाळ'ने पुढे आणली. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन, शहरातील चार रुग्णालयांची कसून तपासणी केली. त्या आधारावर या औषध दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. 

या तपासणीत दुकानांमध्ये औषधांवर बसलेली धूळ तर आढळलीच, पण सर्रास औषधाच्या स्ट्रीपची विक्री केल्याचेही पुढे आले. काही दुकानांच्या फ्रिजमध्ये मुदतबाह्य औषधे सापडली. या तपासणीनंतर या औषध विक्रेत्यांना सात दिवसांची कारणे नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

"एफडीए'चे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते म्हणाले, ""पवन मेडिकल्स, विघ्नहर आणि वेलनेस या मेडिकलचे औषध विक्रीचा परवाने तीस दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. येत्या 13 फेब्रुवारी ते 14 मार्च या दरम्यान ही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'' 

डॉक्‍टरांनी सांगितलेल्या प्रमाणात औषध विक्रीबाबत नियमित तपासणी करण्यात येत आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यापेक्षा जास्त औषध विक्री करणाऱ्या दुकानांचा सुरवातीला परवाना निलंबित केला जाईल. तीच चूक परत करणाऱ्या दुकानाचे परवाना रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

औषध विक्रेता संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र शाखेचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ""डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या प्रमाणातच औषधांची विक्री करावी. कितीही गोळ्यांची स्ट्रिप असली तरीही डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणेच ग्राहकांना गोळ्या देणे आवश्‍यक आहे.'' 

सहआयुक्त विद्याधर जावडेकर म्हणाले, ""कट स्ट्रीपबाबत आलेल्या इतर तक्रारींवर चौकशी सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.''

Web Title: The three medical license suspended