उरुळीत १३ दिवसांत तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीला साथीच्या रोगांना अटकाव घालण्यात अपयश आले आहे. या परिसरातील रुग्णालयात साथीच्या आजारामुळे सुमारे पाचशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. 

उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीला साथीच्या रोगांना अटकाव घालण्यात अपयश आले आहे. या परिसरातील रुग्णालयात साथीच्या आजारामुळे सुमारे पाचशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. 

प्रभावती वाल्मीक कांचन यांचा बारा दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. मंगळवारी (ता. २५) त्यांचे पती वाल्मीक जयवंत कांचन यांचाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला असताना आरोग्य विभाग कागदी घोडी नाचविण्यात मग्न आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग केवळ कागदोपत्री सर्वेक्षण करून दिशाभूल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वाइन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला असताना या रोगाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. डेगी व स्वाइन फ्लूला आटोक्‍यात आण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.  

उरुळी कांचन परिसरात स्वाइन फ्लू व डेंगीसदृश तापाच्या रुग्णांची आकडेवारी वेगाने वाढत असल्याच्या वृत्तास परिसरातील अनेक खासगी रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी दुजोरा दिला. उरुळी कांचनमधील काही कुटुंबांतील सर्वच सदस्या आजारी पडले आहेत. काही डॉक्‍टर, लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.   उरुळी कांचन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आठवडाभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात केवळ पन्नासच्या आसपास डेंगीसदृश तापाचे रुग्ण आढळल्याची नोंद असली तरी, प्रत्यक्षात स्थिती मात्र अतिशय गंभीर आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सुस्त असताना ग्रामपंचायतीत सरपंचपदाचे राजकारण रंगले आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, साथीच्या आजार फैलावत चालले आहेत.  

याबाबत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील कांचन म्हणाले, की परिसरात पाचशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत ही बाब खरी आहे. गावाला सध्या सरपंच व उपसरपंच नसल्याने प्रशासन ढिले पडले आहे.

Web Title: Three people Death due to swine flu in Ururali