esakal | सिंहगड रस्त्यावर कचऱ्याला लागलेल्या आगीत तिघेजण होरपळले; घंटागाडीही जळून खाक

बोलून बातमी शोधा

Fire At Sinhgad Road Garbage
सिंहगड रस्त्यावर कचऱ्याला लागलेल्या आगीत तिघेजण होरपळले; घंटागाडीही जळून खाक
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी(पुणे) : सिंहगड रस्त्यावरील नांदेड (ता. हवेली) येथील स्मशानभूमी जवळील कचरा डेपोला आग लागून त्यामध्ये तिघेजण होरपळल्याची दुर्दैवी घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून ग्रामपंचायतीची घंटागाडीही जळून खाक झाली आहे. आगीत होरपळलेल्या तिघांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(पीएमआरडीए) अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे.

आगीत होरपळून जखमी झालेल्यांमध्ये कचरा गोळा करणारे वृद्ध पती-पत्नी व एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. वृद्ध पती-पत्नी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भाजले असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किरकोळ इजा झाली आहे.

हेही वाचा: पुण्यात जनरल मोटर्सने 1419 कामगारांना नोकरीवरुन काढलं

नांदेड-शिवणे पुलाजवळ नांदेड ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे. येथे नेहमीच कचर्‍याचा खच पडलेला असतो. अग्निशमन दल व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ आगीच्या घटना या ठिकाणी नेहमीच घडत असतात. आज दुपारच्या सुमारास कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यावेळी तेथे कचरा गोळा करणारे वृद्ध पती-पत्नी व ग्रामपंचायत कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना जखमी झाले आहेत.

आगीची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख सुजित पाटील, प्रल्हाद जिवडे, अक्षय नेवसे, ओंकार इंगवले, महेश घटमळ, किशोर काळभोर यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले व रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना उपचारांसाठी पाठविण्यात आले.

हेही वाचा: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; वीकेंड लॉकडाउनचा चांगला इफेक्ट!

img

Garnage van burn in Fire At Sinhgad Road

हेही वाचा: पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह’

खाजगी एजन्सीला तीस लाखांचे कचरा उचलण्याचे टेंडर.....

मिळालेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामपंचायतीने एका खासगी एजन्सीला कचरा उचलून नेण्याचे टेंडर वार्षिक 30 लाख रुपयांना दिलेले आहे. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून या एजन्सीने कचरा उचलून न नेल्याने याठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग साचला होता.

आग लागली की लावली?

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले होते. कचऱ्याच्या ढिगावर भटक्या जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. त्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाला आग लागली की लावली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्दैवाने या आगीमध्ये मात्र वृद्ध पती-पत्नी 50 टक्क्यापेक्षा जास्त होरपळले आहेत.