तीन विद्यार्थ्यांचा लष्करी सेवेचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये अव्वल ठरणारे विद्यार्थी बहुतांश वेळा आपल्या घरातील लष्कराचा वारसा पुढे घेऊन जातात. पण, या तुकडीत अव्वल ठरणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच लष्करीसेवेचा ‘श्रीगणेशा’ केला. लष्कराचा गणवेश हेच स्वप्न लहानपणापासून पाहणाऱ्या या तिघांची स्वप्नपूर्ती गुरुवारी झाली.

‘एनडीए’च्या १३५ व्या तुकडीतील सर्वोत्तम विद्यार्थी असा बहुमान मिळविणारे तीनही विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातून सैन्य दलात जाणारे पहिले आहेत. त्यामुळे सैन्य दलाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना ‘एनडीए’ची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे, त्यात निवड होणे, तसेच तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून अव्वल ठरणे, हे अवघड कार्य या तिघांनी केले आहे. जैप्रीत सिंग, ऋषभ गुप्ता आणि उप्पू शिव गणेश अशी त्यांची नावे आहेत. 

सिंग म्हणाला, ‘‘हवाई दलात मी रुजू होणार आहे. त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे जाणार आहे. प्रबोधिनीतील तीन वर्षांचे प्रशिक्षण हा आव्हानात्मक काळ होता. पण, ते यशस्वी पूर्ण करून चांगला विद्यार्थी होण्याचा बहुमान मिळाल्याने आनंद वाटत आहे.’’

हरियानातील बहादूरगड येथून ‘एनडीए’त प्रवेश घेणारा गुप्ता याला लहानपणापासून लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याची इच्छा होती. या बद्दल तो म्हणाला, ‘‘सैन्य दलात येणारा कुटुंबातील मी पहिलाच आहे. प्रबोधिनीतील घेतलेल्या प्रशिक्षणात अनेक चांगले-वाईट अनुभव मिळाले. मात्र, सरतेशेवटी मिळालेले यश हे नक्कीच आनंददायी आहे.’’ 

गणेश म्हणाला, ‘‘माझे वडील अभियंता आहे. यापुढे मी लष्करात दाखल होणार आहे. तुम्हाला जितके धीट आणि संयमी होता येईल, तितके आव्हानांचा सामना करून यश मिळवाल, हा संदेश यातून मिळतो. त्यामुळेच प्रबोधिनीत प्रशिक्षण घेण्यासाठी तुमची मानसिक क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे.’’

Web Title: Three Student Army Service