स्वाइन फ्लूने शहरात तीन महिलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - स्वाइन फ्लूने शहरात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने सोमवारी दिली. पावसाळी हवेमुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूंचा संसर्ग वाढत आहे; पण नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

पुणे - स्वाइन फ्लूने शहरात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने सोमवारी दिली. पावसाळी हवेमुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूंचा संसर्ग वाढत आहे; पण नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या दोन महिला पुण्यातील राहणाऱ्या होत्या; तर, एक रुग्ण उस्मानाबाद येथून उपचारांसाठी पुण्यात आला होता. या महिन्यातील ३, १९ आणि २१ तारखांना या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य खात्याने नुकत्याच घेतलेल्या ‘डेथ रिव्ह्यू मीटिंग’मध्ये या तीनही रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे शिक्कामोर्तब केले. त्यानंतर महापालिकेने स्वाइन फ्लूमुळे शहरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृत्यू झालेल्या महिला ३६, ६० आणि ५५ वयोगटातील होत्या. 

१२ रुग्ण अत्यवस्थ
शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२ रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. उर्वरित पाच रुग्णांवर रुग्णालयातील अंतररुग्ण विभागात दाखल करण्यात आले आहे. शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये ४१ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असून, त्यापैकी २१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. 

लस होणार उपलब्ध
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘स्वाइन फ्लूच्या विषाणूंची माहिती मिळाल्यानंतर लस उत्पादन सुरू होते. ते आता सुरू झाल्याने प्रतिबंधक लसची निविदा काढण्यात 
आली आहे. 

लसीची निविदा प्रक्रिया पुढील २० दिवसांमध्ये पूर्ण होऊन महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, मधुमेह, हृदयविकार अशा जोखमीच्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमधून ही लस मोफत देण्यात येईल.
डॉ. अंजली साबणे,  आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

हे करा 
    खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरा
    पूर्ण झोप घ्या
    भरपूर पाणी प्या
    लिंबू, संत्री यांचा आहारात समावेश करा

हे टाळा
    गर्दीत जाऊ नका
    ताप, सर्दी, खोकला अंगावर काढू नका
    स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका
 हस्तांदोलन टाळावे

Web Title: Three women die in city by swine flu