पुणे : तनिष्क ज्वेलर्समधून महिलांनी 4 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

आरोपी महिला घटनेच्या दिवशी दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बांगडी विभागात गेल्या.

पुणे : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने तीन महिलांनी बंडगार्डन रस्त्यावरील तनिष्क ज्वेलर्समधून चार लाख 18 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी (ता.3) दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या बाबत प्रकाश पोरजे (वय 34, रा. साठे वस्ती, लोहगाव) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुन्हा गाठी ऋणानुबंधाच्या; 4 मुलींच्या भविष्यासाठी 8 वर्षांनी थाटला संसार​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला घटनेच्या दिवशी दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बांगडी विभागात गेल्या. तेथे त्यांनी कर्मचाऱ्यांना सोन्याच्या बांगड्या व इतर दागिने दाखविण्यास सांगितले. ज्वेलर्समधील कर्मचारी आरोपी महिलांना बांगड्या दाखवत असताना त्यांनी हातचलाखी करून 4 लाख 18 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्यांचे जोड चोरले. चोरीचा संशय येऊ नये म्हणून त्यांना कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून ठेवले होते. तसेच सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी थांबणार नाही आणि चोरी केल्यानंतर कोणाच्याही हाती न लागता त्वरित बाहेर पडता येईल, याची खबरदारी त्यांनी घेतली होती. चोरी झाल्याचे समजल्यानंतर संबंधित तीन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके करत आहेत.

आजारी सहकाऱ्याच्या भेटीसाठी टाटांनी गाठलं पुणे; चर्चा तर होणारच!​

साठा तपासताना चोरी झाल्याचे समजले :
रात्रीच्या वेळी दुकान बंद करताना कर्मचा-यांनी ज्वेलर्समधील शिल्लक दागिने तपासले. त्यावेळी त्यांना बांगड्यांचे जोड कमी असल्याचे समजले. बांगड्यांची चोरी झाली असावी या संशयाने त्यांनी दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना तीन महिलांनी दागिने चोरल्याचे त्यात दिसले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three women stole gold bracelets from Tanishq Jewelers at Pune