पुण्यातील मावळमधील थुगावचा साकव पूल खचला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

या पुलास पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे. क्षमता नसताना अवजड वाहतूक होत असल्याने पुलाची दुरवस्था झाली होती.

बेबडओहोळ (पुणे) : थुगाव साकव पुलाची एक मोरी व लोखंडी कठडे वाहून गेल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलाच्या दुरवस्थेबाबत "सकाळ'ने अनेकदा पाठपुरावा घेतला. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

 

थुगावचा साकव पूल 1959 मध्ये झाला. हा साकव पूल स्थानिक नागरिकाच्या बैलगाडी व हलक्‍या वाहनांसाठी बांधला होता. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून थुगाव परिसरातील वाढलेले नागरिकारण आणि औद्योगिकीकरणामुळे या पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ अधिक वाढली. या पुलास पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे. क्षमता नसताना अवजड वाहतूक होत असल्याने पुलाची दुरवस्था झाली होती. त्याच्या मोऱ्या कमकुवत बनल्या होता. पुलाच्या दुरवस्थेबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले. मात्र, पाटबंधारे विभागाला जाग आली नाही. गेली आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि पुरामुळे थुगाव पुलाच्या मोऱ्यांचा भाग खचला. त्यातील एका मोरीचा भाग वाहून गेला आहे. तीन गावांना जोडणारा व पंचक्रोशीतील नागरिकांना कामशेतला जाण्यासाठी पूल सोईचा आहे. सध्या पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे त्यावरून वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

पावसाचा आणि पुराचा जोर कमी झाल्यानंतर लगेचच साकव पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.''
- ए. एम. गढवाल, शाखा अभियंता

पूल खचण्याची कारणे
- पन्नास वर्षांपूर्वीचा जुना साकव पूल
- क्षमता नसताना अवजड वाहनांची वाहतूक
- एकदाही पुलाची तपासणी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thugave sakav Bridge of pune District is Dangerous and closed for transport