अभिजित कटके व किरण भगत यांच्यातील मानाची कुस्ती बरोबरीत सुटली

जनार्दन दांडगे
सोमवार, 2 एप्रिल 2018

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात झालेली मानाची कुस्ती बरोबरीत सुटली.

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात झालेली मानाची कुस्ती बरोबरीत सुटली.

दोन दिवसांच्या कालावधीत झालेल्या यात्रेनिमित्त शनिवारी (ता. ३१) पहाटे श्रींचा महामस्तकाभिषेकाने यात्रेची सुरुवात झाली. त्यारात्री ९ ते १२ या वेळेत काळभैरवनाथाची पालखीतून मिरवणूक व मध्यरात्री १२ ते पहाटे ३ यावेळेत देवाच्या छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच रविवारी (ता. १) सकाळी ९ वाजता लावणी महोत्सव झाला तसेच दुपारी ३ वाजता झालेल्या २६ निकाली कुस्त्यांसाठी एकूण २१ लाख रुपयांचे इनामे देण्यात आले. मानाच्या पहिल्या पाच कुस्त्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा गणेश जगताप व मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलाचा अक्षय शिंदे, गोकुळ वस्ताद तालमीचा सागर बिराजदार व सचिन येलभर, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा गोकुळ आवारे व कोल्हापूर येथील हसन पटेल यांच्यात झालेल्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या.

तसेच पाचव्या मानाच्या कुस्तीत मोतीबाग तालमीचा बालारफिक व आर्मी स्पोर्ट दिल्लीचा सोनूकुमार यांच्यात झालेल्या कुस्तीत बालारफिक शेख याने सोनूकुमारला चीतपट केले. यावेळी तीनशेहून अधिक मल्ल तसेच कविता राजपूत व ऐश्वर्या नेवसे या महिला मल्लांनी देखील हजेरी लावली होती.  

कुस्ती सामान्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्री काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काळभोर, संयुक्त वन व्यस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत काळभोर, कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्यासह हजारो कुस्तीशौकीन उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज काळभोर यांनी काम पाहिले. 

कुस्ती सामन्यांचे संयोजन पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, उत्सव समिती अध्यक्ष सतीश काळभोर यांनी केले होते. कुस्ती शौकिनांसाठी आखाड्याच्या ठिकाणी चार एलसीडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या तसेच युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. 

Web Title: tied in wrestler abhijit katke and kiran bhagat