Pune News : टिळक चौकातील नियमबाह्य होर्डिंगच्या स्थगितीची याचिका न्यायालयाने फेटाळली

महापालिकेला कारवाईचा मार्ग मोकळा, होर्डिंग ठेवण्यासाठी काही अधिकाऱ्यांची सुरू असलेली धडपड ठरली निष्फळ
tilak chowk hoarding petition denied by court advertisement
tilak chowk hoarding petition denied by court advertisement sakal

Pune News : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही टिळक चौकातील (अलका टॉकीज चौक) छत्रपती संभाजी महाराज पोलिस चौकीमागील नियमबाह्य होर्डिंग ठेवण्यासाठी काही अधिकाऱ्यांची सुरु असलेली धडपड अखेर निष्फळ ठरली. संबंधित होर्डिंगवरील कारवाईला स्थगिती देण्याबाबतची याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

त्यामुळे आता नियमबाह्य होर्डिंगला आता अभय मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून महापालिकेकडून कारवाईचा मार्गही आता मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग उभारण्यात आल्या आहेत.

संबंधित होर्डिंग उभारताना दोन होर्डिंगमध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, झाडे तोडणे, राडारोडा टाकणे, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्‍याच्या ठिकाणी हा प्रकार सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात होर्डिंगच्या कामाला स्थगिती देऊन त्यावर जाहिरात प्रसिद्ध करण्यावरही महापालिकेने बंदी घातली होती.

दरम्यान, संबंधित होर्डिंग उभारताना प्रत्यक्षात जागेवर काय स्थिती आहे, याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले होते. या होर्डिंगचा परवाना रद्द केल्यानंतर या भल्यामोठ्या होर्डिंगचा लोखंडी सांगडा महापालिकेने काढणे अपेक्षीत होते.

मात्र त्यानंतरही काही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबरोबरच होर्डिंगची जागा खासगी मालकाची नव्हे, तर महापालिकेची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याच होर्डिंग व्यावसायिकास अकरा महिने मुदतीने जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची हालचाल सुरु झाली होती.

काही अधिकाऱ्यांकडून सुरू असलेला हा प्रकार "सकाळ'ने उघडकीस आणला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी होर्डिंग अधिकृत करण्याचा प्रस्ताव न पाठवता, ते होर्डिंग थेट काढून टाकण्याचा प्रस्ताव सादर करावा, असा आदेश दिला होता.

त्यानंतर महापालिकेकडून त्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. या घडामोडीनंतर होर्डिंग चालकाने जिल्हा न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती.

दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावल्याचे महापालिकेच्या विधी विभागाच्या प्रमुख ऍड.निशा चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता, संबंधित होर्डिंगवर कारवाई करण्याचा महापालिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

"" टिळक चौकातील नियमबाह्य होर्डिंगवरील कारवाईला स्थगिती देण्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संबंधित होर्डिंगवर महापालिका प्रशासनाकडून आता कारवाई केली जाईल.''

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com