Pune University Traffic : गणेशखिंड रस्ता लवकरच घेणार मोकळा श्वास; हा पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कृषी महाविद्यालयातून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामाला एक महिना पूर्ण झाला असून, रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
to reduce traffic jam Alternative route in College of Agriculture to start in 15 days pune
to reduce traffic jam Alternative route in College of Agriculture to start in 15 days puneSakal

Pune News : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कृषी महाविद्यालयातून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामाला एक महिना पूर्ण झाला असून, रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

तर रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्‍यता आहे. शिवाजीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरून रेंजहिल्स, बोपोडी, खडकीकडे जाणाऱ्या दुचाकीसह हलक्‍या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावरील बहुमजली उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरण अशा वेगवेगळ्या कामांमुळे वाहनचालकांना अजूनही वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करण्यासाठीचा प्रस्ताव पुढे आला होता.

मात्र या रस्त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची, तसेच प्रशिक्षण वर्ग, शेती, प्रात्यक्षिक क्षेत्र या सगळ्यांनाच फटका बसण्याची शक्‍यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता.

फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महापालिका, कृषी महाविद्यालय व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती,

त्यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगतच्या रस्त्याचा पर्याय पुढे आला होता. त्याला सर्व विभागांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर १३ फेब्रुवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती.

कृषी महाविद्यालय व महामेट्रोच्या सीमाभिंतीजवळून पर्यायी रस्ता तयार केला जात आहे. या परिसरात कृषी महाविद्यालयाची शेती असल्याने रस्त्यासाठी प्रारंभी सपाटीकरण, मुरूम व मातीच्या भरावाचे दोन स्तर करण्यात आले आहेत.

त्यानंतर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे खडी व कच यांचे मिश्रण टाकण्यात आले आहे.

सध्या खडीकरण सुरू आहे. त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण केले जाणार आहे. या कामासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

असा असेल पर्यायी रस्ता

साखर संकुल येथील महामेट्रोच्या प्रवेशद्वारापासून कृषी महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील अंडी उबवणी केंद्राजवळील लोहमार्ग पुलाखालून पुढे जाण्यासाठी हा रस्ता तयार केला जात आहे. एक ते दीड किलोमीटर अंतराचा हा रस्ता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजीनगरहून बोपोडी, खडकी, पिंपरी -चिंचवडकडे जाणाऱ्या दुचाकी व हलक्‍या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्‍यता आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com