आजपासून धडाडणार नेत्यांच्या "तोफा' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख नेते शहरात येत असल्याने जाहीर सभांची रणधुमाळी उद्यापासून (ता. 13) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. त्याची सुरवात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार जाहीर सभा सोमवारी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. 

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख नेते शहरात येत असल्याने जाहीर सभांची रणधुमाळी उद्यापासून (ता. 13) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. त्याची सुरवात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार जाहीर सभा सोमवारी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. 

महापालिका निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याच्या प्रचारासाठी आता शेवटचे सात दिवसच राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा ज्वर वेगाने वाढत असून, त्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते शहरात येत आहेत. पदयात्रा, मेळावे, प्रचार फेऱ्यांबरोबरच आता चाळीसहून अधिक जाहीर सभा शहरात होणार आहेत. 

भाजपच्या सभा आजपासून 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात सोमवारी (ता. 13) चार सभा होणार आहेत. बाणेरमध्ये माउली मंगल कार्यालयाजवळ सायंकाळी 5.30 वाजता, त्यानंतर डहाणूकर सोसायटीजवळ सायंकाळी 6.15 वाजता, सातारा रस्त्यावर वाळवेकर लॉन्सजवळ सायंकाळी 7 वाजता, त्यानंतर हडपसरमध्ये शिवसाम्राज्य चौकात रात्री 8 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. 15 फेब्रुवारीला विनय सहस्रबुद्धे, 16 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, राज्याचे मंत्री विनोद तावडे, 17 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, 18 आणि 19 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सभा होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याही सभांसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या बुधवारी (ता. 15) टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे सभा होईल. डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानुगडे पाटील यांच्या जाहीर सभाही होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या शुक्रवारी (ता. 17) सभा होणार आहे. 

कॉंग्रेसचे "स्टार प्रचारक' रणांगणात 
कॉंग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील नेते पुणे महापालिका निवडणूक प्रचारासाठी उतरणार आहेत. या आठवड्यात हे "स्टार प्रचारक' पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सभा घेणार असून, पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ते मतदारांना करणार आहेत. 

पुण्याच्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची प्रथमच आघाडी झाली आहे. काही जागांवर या पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीही होत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर प्रचाराच्या शेवटी कॉंग्रेस आपले स्टार प्रचारक प्रचारासाठी निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उद्यापासून धडाका 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 14 फेब्रुवारी रोजी वडगाव शेरी, 15 फेब्रुवारीला हडपसर, 18 फेब्रुवारीला खडकवासला आणि पर्वती विधान सभा मतदार संघात जाहीर सभा होणार आहेत. त्याच बरोबर पक्षाचे नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्या जाहीर सभा 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होतील. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शेवटच्या टप्प्यात विविध भागांत रॅली काढणार आहेत.

Web Title: today start leader meeting