पतीचे स्वप्न स्वातीताईंकडून ‘सार्थकी’

पतीचे स्वप्न स्वातीताईंकडून ‘सार्थकी’

विवाह थाटामाटात झाला. आयुष्यासाठी चांगला, मनासारखा जोडीदार मिळाला. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच काही होते. आयुष्याच्या या नवीन पर्वात सुखी संसाराला सुरूवात झाली. लागलीच प्रपंचाच्या या वेलीवर ‘सार्थक’ नावाचे फूल उमलले आणि दुसरा ‘साहिल’ नावाचा मुलगा आठ महिन्यांचा पोटात असतानाच सौभाग्यरत्न हरपले. प्रपंचरूपी रथाचे एक चाक निखळले. काही वर्षांपूर्वी गुदरलेला हा प्रसंग सुपे (ता. बारामती) येथील स्वाती सचिन कुलथे यांच्याविषयीचा आहे.
ऐन तारुण्यात आयुष्याचा सोबती गेल्यानंतर दुःख करत न बसता त्यांनी कंबर कसली. स्वर्गीय सचिन यांचा ‘सचिन ज्वेलर्स’ या नावाने सुप्यात सराफी व्यवसाय चालू आहे. या व्यवसायाची त्यांनी चांगली माहिती करून घेतली. मुळात स्वाती यांचा हा वडिलार्जित सोनार-सराफी व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायाचे बाळकडू त्यांना अंगभूतच होते. पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या स्वाती यांचा स्वभाव मनमिळाऊ व बोलण्यात गोडवा आहे. त्यामुळे त्यांनी व्यवसायाची विस्कटलेली घडी लागलीच बसवली. कुटुंबातील आई-बाबा, सासूबाई, दीर व जाऊबाई यांच्याकडून प्रतिकूल काळात त्यांना चांगला धीर मिळाला. व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले.
पती सचिन यांनी सन १९९७ मध्ये म्हणजे सुमारे २५ वर्षांपूर्वी सुपे गावातील मुख्य बाजारपेठेत सराफी दुकान सुरू केले. सुरवातीला सात-आठ वर्षे केडगाव ते सुपे जाऊन-येऊन करून सचिनशेठ हे दुकानाचे कामकाज सांभाळत होते. त्यानंतर सन २००६ मध्ये त्यांच्याशी स्वातीताई यांचा विवाह झाला. मात्र, त्यांच्या या संसाराला दृष्ट लागली. सुमारे दोन वर्षातच प्रपंचाचा सर्व भार त्यांच्यावर पडला. मात्र, दुःख, शोक करत न बसता कंबर कसली. या काळात काही लोकांकडून त्रासही झाला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून लक्ष्य साध्य केले.
दरम्यानच्या काळात स्वातीताई यांनी जोड व्यवसाय म्हणून कापड व रेडिमेड कपड्यांचे दुकान थाटले. हेही दुकान चांगले चालायला लागले. पुढे काळाची पावले ओळखून सचिन यांच्या स्वप्नातील पेढी उभी करण्यासाठी परिश्रम घेतले. आणि फक्त सराफी पेढीवर लक्ष केंद्रित केले. अनेक गरजूंच्या हाताला काम मिळाले. त्यांचे संसार उभे राहिले. स्वतःचा संसार अर्ध्यावरच मोडला असला, तरी त्यांनी स्वतःच्या दुकानात काम देऊन दुसऱ्यांचा संसार उभा केला. गरजू, अनाथांना मदतीचा हात देतात. स्वामी समर्थांची पुस्तके वाचतात. धार्मिक कामातही त्या अग्रेसर असतात. सुपे परिसरात एक विश्वसनीय सराफी पेढी म्हणून त्यांचे ‘सचिन ज्वेलर्स’ हे दुकान चालू आहे. ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली ही सराफी पेढी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com