कुसेगाव-बिबटयाच्या हल्ल्यात पाच पाळीव प्राण्यांचा मृत्यू

कुसेगाव-बिबटयाच्या हल्ल्यात पाच पाळीव प्राण्यांचा मृत्यू

पाटस, ता. १२ : कुसेगाव (ता. दौंड) येथे बिबट्याने शुक्रवारी व शनिवारी सलग दोन रात्री धुमाकूळ घालत पाच पाळीव प्राण्यांवर हल्ला चढविला. यामध्ये तीन शेळ्या, एक वासरू व एक कुत्रा यांचा जागीच मृत्यू झाला.
दौंड तालुक्यातील कानगाव, पाटस, दापोडी, नानगाव व त्यानंतर कुसेगाव येथे बिबट्याचे अस्तित्व दिसून येत आहे. कुसेगाव येथे सलग दोन दिवसांपासून बिबट्याने धुडगुस घातला आहे. बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्री गणेश शितोळे यांच्या घरासमोरील देशी गायच्या वासरावर हल्ला करीत त्याच्या शरीराचा काही भाग फस्त केला. सकाळी उठल्यानंतर त्यांना वासरू मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. एका व्यक्तीला पडवी व कुसेगावच्या हद्दीत बिबट्या दिसून आला.
दरम्यान, शनिवारी (ता. १२) मध्यरात्री बिबट्याने गावालगत असणाऱ्या एका वस्तीवर आपला मोर्चा वळविला. बिबट्याने छाया मोहन शितोळे यांनी घरासमोर बांधलेल्या तीन शेळ्यांवर हल्ला चढविला. यामध्ये बिबट्याने शेळ्यांच्या शरीराचा काही भाग फस्त केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. छाया शितोळे सकाळी उठल्यानंतर त्यांना अंगणात मृत शेळ्या छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचे दिसून आले. तसेच, काही अंतरावरील एका व्यक्तीचे पाळीव कुत्रेही बिबट्याने गायब केले.
याबाबतची माहिती मिळताच वनपरीमंडल अधिकारी शीतल खेंडके, वनरक्षक शीतल मेरगळ, भरत शितोळे, पोलिस पाटील गणेश शितोळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वनपाल शीतल खेंडके यांनी मृतप्राण्यांची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.
याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शेतशिवारात एकटे फिरू नये. फटाके वाजवावेत. पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com