smashanbhumi
smashanbhumisakal

Aandhalgav News : दशक्रिया विधी घाट झालेत भाषणबाजीची केंद्रे

शिरूर तालुक्यात सर्वत्र आता सुसज्ज दशक्रिया घाट तयार केले आहेत. मात्र, गावागावांत होणारे दशक्रिया विधी मोठ्या प्रमाणावर भाषणबाजीची केंद्रे झाली.

- प्रमोद कुसेकर

आंधळगाव - शिरूर तालुक्यात सर्वत्र आता सुसज्ज दशक्रिया घाट तयार केले आहेत. मात्र, गावागावांत होणारे दशक्रिया विधी मोठ्या प्रमाणावर भाषणबाजीची केंद्रे झाली. मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने झोडल्या जाणाऱ्या भाषणांमुळे हे घाट आता राजकारण्यांच्या मतपेटीचे अड्डे झाले आहेत.

या प्रकाराबाबत दशक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. ‘अरे, यांना कोणीतरी आवरा हो’ असा सूर निघत आहे.

तालुक्यात बहुतांश दशक्रिया कार्यक्रमात श्रद्धांजली वाहणाऱ्यांची संख्या आठ-दहाच्या कमी नसते. एवढ्या मोठ्या संख्येने भाषणाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांची संख्या असेल तर उपस्थितांचे हाल होतात. त्यातही उन्हात बसलेल्या श्रोत्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.

बऱ्याचदा ही मंडळी वेळेचे भान न पाळता श्रद्धांजलीच्या नावाखाली लांबलचक व रटाळ भाषणबाजी करतात. त्यातून दशक्रियेला उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाचा वेळ नाहक वाया जातो.

घाटावर आलेली बहुतांश मंडळी शेतकरी असतात, याचेही भान बोलण्याच्या नादात या बोलघेवड्या मंडळींकडून ठेवले जात नाही. शेतकऱ्यासाठी सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची व मौलिक असते. दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करण्याची व त्यासाठी मजुरांसह आवश्यक साधनांची जमवाजमव करण्याची ही वेळ असते.

परंतु, सकाळी ८ वाजता सुरू होत असलेले दशक्रिया विधी पुढाऱ्यांच्या भाषणबाजीमुळे कमीत कमी १० ते ११ वाजेपर्यंत लांबतात. यात गैरहजर असलेल्या खासदार, आमदार व अन्य लहानमोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन, मी त्यांच्या फार जवळचा आहे, असे दाखवत त्यांच्या वतीने शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांची जणू स्पर्धाच लागलेली असते.

‘यांना कोणी तरी आवरा’

काकस्पर्श होईपर्यंत श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलणे अपेक्षित असताना काकस्पर्श झाल्यानंतरसुद्धा तासभरापेक्षा जास्त वेळ या मंडळींची भाषणबाजी सुरूच राहते. दशक्रियेच्या निमित्ताने जमलेल्या आयत्या गर्दीचा भाषणबाजी व प्रसिद्धीसाठी या मंडळींकडून वापर केला जातो. परंतु, मृत व्यक्तीच्या जीवनमानाबद्दल काहीही माहिती नसतानासुद्धा ही मंडळी भरभरून बोलतात. मात्र, खाली बसणारे चुळबुळ असतात व आपापसांत म्हणताना ऐकू येते, ‘अरे यांना कोणीतरी आवरा रे.’

राजकीय विरोधकांची उणीदुणी

कधी कधी उपस्थित असलेल्या राजकीय विरोधकांची उणीदुणी काढण्याचे व टोमणे मारण्याचे किस्सेही तालुक्यातील अनेक दशक्रिया घाटावर उरकले आहेत. यातून दशक्रिया विधीघाटाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर होऊ लागल्यासारखे वाटत आहे. या भाषणबाजीमुळे दशक्रिया विधीचा मूळ उद्देशच दुर्लक्षिला जात आहे. त्यातून वेळेचे भान न पाळल्याने विधीचे पावित्र्यसुद्धा हरवले जात आहे.

दशक्रिया विधीवेळी कुटुंबाचे सांत्वन कमी प्रमाणात व भाषणबाजी जास्त, अशी स्थिती दिसून येत आहे. ही पडलेली प्रथा कुठेतरी थांबली पाहिजे. मोजक्या व्यक्तींनीच सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायला हवी.

- वैभव बोत्रे, सामाजिक कार्यकर्ते, पारगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com