भरधाव मोटारीच्या धडकेत पाच जण ठार

भरधाव मोटारीच्या धडकेत पाच जण ठार

आळेफाटा, ता.२८ : नगर-कल्याण महामार्गावरील आळे गावच्या हद्दीत लवणवाडी (ता. जुन्नर) येथे भरधाव मोटारीने आठ जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जण ठार झाले. यामध्ये १८ महिन्याच्या चिमुकल्यासह सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.२७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पारनेर तालुक्यातील शेतमजूर हे नारायणगाव येथे कामासाठी आले होते. सोमवारी रात्री काम उरकल्यावर हे दोन दुचाकीवरून घरी जात असताना नगर-कल्याण मार्गावरील आळे गावच्या हद्दीत भरधाव पीकअप या मोटारीने आठ जणांना जोरात धडक दिली. या घटनेमुळे चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. अपघातात सुंदराबाई रोहित मधे (वय १८), गौरव रोहित मधे (वय ६), सुहास यमा मधे (वय-२४), नितीन शिवाजी मधे (वय २२), आर्यन यमा मधे (१८ महिने, सर्व रा. पळशीवनकुटे, ता. पारनेर जि. नगर) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जणांना पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्यात आले. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी यांची माहिती आळेफाटा पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे धोकादायक लवणात आहे. दोन्हीही बाजूने उतार असून, या जागेवर वारंवार अपघात झालेले आहेत. तसेच येथे शाळा, दूध डेअरी, मंदिर असल्यामुळे नेहमीच गर्दी असते. त्यामुळे या जागेवर गतिरोधक बसवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com