काश्‍मिरी सफरचंदाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी

काश्‍मिरी सफरचंदाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी

आळेफाटा, ता. ८ : पारंपरिक फळझाडांतून मर्यादित उत्पादन मिळविण्यापेक्षा शाश्‍वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळांकडे प्रगतशील शेतकऱ्यांचा कल आता वाढला आहे. चाळकवाडी (ता.जुन्नर) येथील अजित बाळासाहेब पायमोडे यांनी अविट गोडीची काश्‍मिरी सफरचंद फुलविण्याची अनोखी किमया साधली आहे. त्यांनी येथील उष्ण वातावरणात ''हर्मन ९९'' या वाणाची लागवड करून सेंद्रिय खते, किड नियंत्रण तसेच पाणी व्यवस्थापनाच्या जोरावर केवळ दोन वर्षात यश संपादन केले आहे. त्यांचा हा १५ गुंठ्यातील प्रयोग तरुण शेतकऱ्यांसाठी वस्तूपाठ ठरला आहे.


सफरचंद या फळाचे उत्पादन काश्‍मीर, हिमाचल प्रदेशात येथील थंड वातावरणात घेतले जाते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अजित पायमोडे यांनी जुन्नरमध्ये सफरचंदाच्या शेती फुलविली आहे. सफरचंदाच्या लागवडीसाठी त्यांनी हिमाचल प्रदेशात जाऊन सफरचंदाचे पीक लागवड पद्धतीचा अभ्यास केला. थंड व उष्ण तसेच दमट वातारणात कोणत्या वाणाचे सफरचंद फुलेल यांची सखोल माहिती घेतली. औषध फवारणी, बियांचे प्रकारे माहीत करून घेतले. त्यानुसार ''एना'' या जातीला थंड वातावरण तर ''हर्मन ९९'' वाणाला उष्ण वातावरणात सहाय्यभूत होते. यामुळे पायमोडे यांनी ''हर्मन ९९'' या जातीच्या सफरचंदाची लागवड करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी २०२१ मधील ऑगस्ट महिन्यत रोपांची लागवड केली.


१. एक ट्रॉली शेण खत पांगविले.
२. ७ बाय ९ फुटांच्या अंतरावर बेड पध्दतीने सरी तयार केल्या
३. यामध्ये १२५ रोपांची लागवड
४. सेंद्रिय, खते, पाणी व्यवस्थापन केले
५. फळांचा आकार मोठा येण्यासाठी विशेष काळजी घेतली

रु. ४०,००० : दोन वर्षातील खर्च
रु. १,००,००० : अपेक्षित उत्पादन
रु. १५० (प्रतिकिलो) : सध्या मिळणारा भाव

भविष्यात शाश्‍वत उत्पादन
संपूर्ण बागेला सेंद्रिय खते वापरल्याने दोनच वर्षांत १२५ झाडांना फळे लगडली आहेत. एका झाडामागे कमीत कमी १० किलो सफरचंदाचे उत्पादन मिळणार आहे. सध्या या फळाला सरासरी १५० रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. यानुसार सुमारे एक टन माल निघणार आहे. यामुळे एक बहरात एक लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. ही झाडे पंधरा ते वीस वर्षांपर्यंत चालत असल्याने भविष्यात शाश्‍वत उत्पादन मिळेल, असा विश्‍वास सफरंचद उत्पादक अजित पायमोडे यांनी ''सकाळ'' बालताना व्यक्त केला आहे.


दरम्यान, सफरचंदाची बाग बहरविण्यासाठी पायमोडे यांना त्यांचा मुलगा सागर यांचे सहकार्य लाभत आहे. सागर यांनी बी.एस.सी ॲग्री व एम.बी.ए. असे शिक्षण घेतले त्याने एक रोपवाटीका फुलविली आहे.

सफरचंदाची लागवड हिमाचल प्रदेश, काश्‍मीर या थंड प्रदेशात होते. यामुळे अभ्यास करून येथील वातावरणात तग धरू शकणारे सफरचंदाच्या ''हर्मन ९९''या वाणाची लागवड केली. रोपांच्या लागवडीनंतर सेंद्रिय खत व योग्य जोपासना केल्यामुळे फळांची योग्य वाढ झाली.
- अजित पायमोडे, सफरचंद उत्पादक

02819, 41649
........................
420595216, 1938920875

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com