धामणीतील खंडोबाच्या यात्रेत पळाले नवसाचे १६० बैलगाडे
पारगाव, ता. २ : धामणी (ता. आंबेगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण १६० बैलगाडे पळाले.
येथील यात्रेला काल रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली. यात्रेला नवसाच्या बैलगाड्यांची शर्यती आयोजित केल्या जातात. विजेत्या बैलगाडा मालकांना कोणतेही बक्षीस दिले जात नसले तरी केवळ श्रद्धेपोटी शेकडो बैलगाडा मालक या शर्यतीमध्ये सहभागी होतात. धामणी परिसरातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून शर्यतीसाठी सुसज्ज शर्यतीचा नवीन घाट बांधण्यात आला आहे.
बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, विजय जाधव, शांताराम जाधव, विलास पगारिया, सरपंच अक्षय विधाटे, रामदास म्हातारबा जाधव, वामन जाधव यांच्या हस्ते झाले.
एकूण १६० बैलगाडा मालकांनी आपले बैलगाडे आणून सहभाग घेतला. शर्यतीची व्यवस्था माजी सरपंच सागर जाधव, शरद बाळासाहेब जाधव, दिलीप वाघ, संदीप रोडे, तुषार जाधव, आकाश जाधव, संजय जाधव, प्रतिक जाधव, रंगनाथ करंजखेले, शांताराम दत्तात्रय जाधव व धामणी, शिरदाळे, पहाडदरा व ज्ञानेश्वरवस्ती येथील ग्रामस्थांनी पहिली.

