भोरमधील जानाई मंदिराचा घाट स्वच्छ

भोरमधील जानाई मंदिराचा घाट स्वच्छ

भोर, ता. २६ : संत निरंकारी मंडळाच्या वतीने अमृत प्रकल्प- स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमाअंतर्गत रविवारी (ता.२६) शहरातील नीरा नदीवरील शनी मंदिर घाट व जानाई मंदिराच्या घाटाची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली.
संत निरंकारी मंडळाचे भोर, कारी व नाझरे येथील १५० जलदूतांसमवेत नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील १० कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी पाच तासांमध्ये ही कामगिरी केली. या अमृत प्रकल्पामुळे शनीघाट व जानाईघाटावरील झाडेझुडपे, घाण, दलदल आणि दुर्गंधी कायमची बंद झाली. यामुळे आता भोरवासीयांना आणि इतर पर्यटकांना सायंकाळी शनीघाटावर व जानाईघाटावर फिरणे कंटाळवाणे आणि किळसवाणे वाटणार नाही.
भोर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख महेंद्र बांदल व पाणीपुरवठा अधिकारी किशोरी फणसेकर, संत निरंकारी मंडळाचे अजित चिकणे, ज्ञानोबा खोपडे व घनश्याम देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीघाटाच्या स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली. लांब दांड्याचे खोरे, बांबू, दांताळ, रस्सी, खराटे, घमेली, बोरीक पावडर आणि घंटागाडी आदींच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी केला. याकामी संत निरंकारी मंडळाचे शहाजी शिंदे, ज्ञानोबा देवघरे, दत्तात्रेय चव्हाण, निर्मला सोनवणे, आशा पवार, अलका बांदल व लक्ष्मण मांढरे आदी प्रमुख मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले.


नगरपालिकेचे पदाधिकारी उदासीन
संत निरंकारी मंडळाच्या वतीने नगरपालिका प्रशासनास अमृत प्रकल्पामध्ये शहरातील घाटांची स्वच्छता करणार असल्याचे निवेदन आठ दिवसांपूर्वीच दिलेले होते. परंतु नगरपालिकेचे महेंद्र बांदल आणि किशोरी फणसेकर हे दोन अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या १० कर्मचाऱ्यांशिवाय नगरपालिकेचा एकही पदाधिकारी स्वच्छतेसाठी फिरकला नाही. यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सर्व पदाधिकाऱ्यांची स्वच्छतेच्या बाबतीत उदासीनता पुन्हा एकदा दिसून आली.


01362

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com