भोरमधील अतिक्रमणे हटविली

भोरमधील अतिक्रमणे हटविली

भोर, ता. १५ : शहरातील नवी आळी परिसरातील नगरपालिकेच्या २ एकरांच्या जागेवर केलेली अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने बुधवारी (ता. १५) पोलिस बंदोबस्तात हटविली. नवी आळीतील तालुक्यातील शासनाच्या सर्व विभागांची कार्यालये एकाच इमारतीमध्ये येणार असलेल्या शासकीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भोर नगरपालिका प्रशासनाने बुधवारी सकाळी ११ वाजता ५ जेसीबी, ३ ट्रॅक्टर आणि १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अतिक्रमणे काढून टाकली. शहरातील नवी आळीतील मुस्लिमांच्या दफनभूमीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत २४ जणांनी अतीक्रमण करून घरे बांधली होती. त्या ठिकाणी तालुक्याची प्रशासकीय इमारत होणार असून, त्यासाठी शासनाकडून निधीही मंजूर झालेला आहे. मात्र, ही जागा नगरपालिकेच्या ताब्यात असून, तेथे अतिक्रमणे असल्यामुळे सुमारे ८ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत होता. परंतु, नगरपालिका आणि महसूल प्रशासनाने पोलिसांच्या संरक्षणात अतिक्रमणे काढून टाकली.
‘आम्ही आता कुठे राहायचे?’ असा प्रश्न उपस्थित करून अतिक्रमणधारकांनी गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील, पोलिस उपअक्षीक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, उनगराध्यक्ष समीर सागळे, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, तानाजी तारू आदींनी नागरिकांशी चर्चा केली. नगरपालिकेकडून सर्व्हे नंबर १४६० मधील आरक्षीत केलेल्या जागेवर त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी पंतप्रधान योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधून देण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून टाकली.
बंदोबस्तासाठी ५ पोलिस अधिकारी, २० महिला पोलिस आणि ५० पोलिस कर्मचारी हजर होते. सायंकाळी उशिरापर्यंत अतिक्रमण काढण्याचे काम सुरु होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com