नवीन मतदारांना स्मार्टकार्डसारखे
मतदान ओळखपत्र घरपोच

नवीन मतदारांना स्मार्टकार्डसारखे मतदान ओळखपत्र घरपोच

भोर, ता. २२ ः वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी ऑनलाइन मतदान नोंदणी केल्यानंतर महिन्याभरातच नवीन स्मार्टकार्ड स्वरूपाचे मतदान ओळखपत्र मिळू लागले. त्यामुळे मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्रीय भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीचा वापर करून नवीन मतदारांना मतदान ओळखपत्र मिळण्याची सुविधा अत्यंत सोपी आणि जलद झालेली आहे. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी आपले निवडणूक मतदान कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) राजेंद्र कचरे यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाकडून मिळत असलेल्या नवीन मतदान कार्ड असलेल्या पाकिटात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा संदेश आणि मतदारांची प्रतिज्ञाही पाठविली आहे. नवीन मतदान फोटो ओळखपत्र (कार्ड) वर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये मजकूर छापलेला आहे. नवीन मतदार हा स्वतःच माहिती भरत असल्यामुळे त्यामध्ये स्पेलिंग व व्याकरणाच्या चुका होत नाहीत. ओळखपत्राच्या पुढील बाजूला फोटोसहीत मतदान ओळखपत्र क्रमांक, मतदारांचे नाव, वडिलांचे नाव, लिंग आणि जन्मतारीख दिलेली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्मार्ट कार्ड चीप बसविली असून देशाची राजमुद्रा आणि भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह देखील दाखविलेले आहे. ओळखपत्राच्या मागील बाजूला दोन्ही भाषांमध्ये संपूर्ण पत्ता, मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्या मतदारसंघाचा क्रमांक आणि क्युअर कोडही दिलेला आहे. याशिवाय निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी आणि हे ओळखपत्र फक्त निवडणुकीपुरते असून वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही, अशा प्रकारच्या दोन टीपही दिलेल्या आहेत. याखेरीज ओळखपत्र डाऊनलोड केल्याची तारीखही दिलेली आहे, अशी व्यवस्थितपणे माहिती मिळत असल्यामुळे नवीन मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याचा आहे समावेश
भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यात मागील दोन वर्षांत २३ हजार ४८३ नवीन मतदान कार्डचे वितरण केले आहे. यामध्ये भोर तालुक्यातील सहा हजार ५४०, वेल्हे तालुक्यातील ८१३ आणि मुळशी तालुक्यातील १६ हजार १३० नवीन मतदारांचा समावेश आहे. याशिवाय अनेकांनी ऑनलाइन अर्ज केलेले असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

या ठिकाणी नोंदणी करावी
निवडणूक ओळखपत्राचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आयोगाच्या https://nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. योग्य प्रकारे माहिती भरून झाल्यानंतर जन्माचा आणि रहिवासाचा पुरावा व फोटो अपलोड करावा लागणार असल्याचेही प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com