
घरातून कचरा विलगीकरण व्यवस्थितच व्हायला हवे
बारामती, ता. १८ : ‘‘कचऱ्याचे वर्गीकरण करताना महिलांनी काळजी घ्यायला हवी, नागरिकांनी कचरा विलगीकरण नीट न केल्याने कचरावेचकांना आजारांना सामोरे जावे लागते, याचा विचार करुन या पुढील काळात प्रत्येक घरातून कचरा विलगीकरण व्यवस्थितच व्हायला हवे,’’ असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सुरक्षित बारामती अभियानाअंतर्गत डॉ. भोईटे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सॅनिटरी पॅडचा कचरा कागदाने गुंडाळून व लाल ठिपक्यांची चिन्हांकित करून घंटागाडीला द्यावा. सॅनिटरी पॅडचा कचरा वर्गीकृत दिला नाही, तर कचरा वेचकांना व सफाई कर्मचाऱ्यांना स्टेफीलोकोकस, हिपॅटायटिस, इ कोलाय, साल्मोनेला आणि टायफाईड यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. कचरा एकत्रित दिला गेला तर त्यावर प्रक्रीया करता येत नाही. सॅनिटरी पॅड हे सडत किंवा कुजत नाही. त्यामुळे ते घंटागाडीला देताना वेगळेच द्यावे.
यावेळी ‘सुरक्षित बारामती’ अभियानाच्या ब्रॅण्डिंगचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून व घंटागाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले. आरती पवार यांनी या प्रसंगी माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याधिकारी महेश रोकडे, कुसुम वाघोलीकर, सीमा चव्हाण, संगीता काकडे, दीपा महाडीक, अंजली संगई, आरोग्य विभाग प्रमुख आदित्य बनकर, अडसूळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, स्वच्छता निरीक्षक अजय लालबिगे, कुणाल लालबिगे, अक्षय नाईक आदी उपस्थित होते.