वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर
बारामतीत संयुक्त कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर बारामतीत संयुक्त कारवाई

बारामती, ता. १० : वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांत राज्यभरात अपघातांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही सर्रास वाढत आहे. अशा स्थितीत कारवाईशिवाय पर्याय नाही, ही बाब विचारात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांकडे वाहनांची कागदपत्रे नसणे, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, यासह ट्रीपल सीट वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, बेकायदा पार्किंग करणे, अशा विविध बाबी हे पथक तपासणार आहे.
या पथकामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांकडूनही अधिकारी व कर्मचारी, असे आठ जणांचे पथक तयार करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी हे पथक संयुक्तपणे कारवाई करणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून ही कारवाई टाळावी, असे आवाहन केसकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com